आशिष शेलार राज्य सरकारच्या विरोधात भूमिका मांडत असल्यामुळेच त्यांना धमकी देण्यात आली – देवेंद्र फडणवीस

नागपूर : ९ जानेवारी – भाजपचे आमदार आशीष शेलार सातत्याने राज्य सरकारच्या विरोधात भूमिका मांडत असून सरकारचा भ्रष्टाचार व सरकारमधील अनागोंदी कारभार ते चव्हाटयावर आणत आहेत. त्यामुळे त्यांना धमकी देण्यात आली असेल, असा आरोप विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला.
फडणवीस सकाळी नागपुरात आले असता प्रसार माध्यमांशी बोलत होते. शेलार यांनी मुंबई महापालिकेतील घोटाळा बाहेर काढला. त्यामुळे त्यांना कोणी धमकी दिली असेल तर ते गंभीर आहे. पोलिसांनी ही धमकी गांभीर्याने घेतली पाहिजे. आघाडीतील नेत्यांना धमकी आली की सरकारकडून तात्काळ जशी दखल घेतली जाते तशी शेलार यांच्याबाबतीत सरकारने दखल घ्यावी आणि धमकी देणाऱ्यांचा शोध घेत त्याच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.
नागपुरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या इमारतीची जैश ए मोहम्मद या अतिरेकी संघटनेकडून टेहळणी होणे ही अतिशय गंभीर बाब आहे. याची माहिती आता पोलिसांना आणि केंद्रीय यंत्रणांना मिळाली आहे. त्यामुळे यासंदर्भात योग्य खबरदारी राज्याचे पोलीस आणि केंद्रीय यंत्रणा घेतील, असा विश्वास आहे, याकडेही फडणवीस यांनी लक्ष वेधले.
अमृता फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या विद्या चव्हाण यांच्यामध्ये सुरू असलेल्या आरोप -प्रत्यारोपावरुन फडणवीस म्हणाले, महिलांसंदर्भात वक्तव्य करताना फक्त राजकीय पक्षांनीच नाही तर सर्वानीच मर्यादा पाळली पाहिजे. विद्या चव्हाण यांना नोटीस देण्यात आली आहे.

Leave a Reply