संपादकीय संवाद – विदर्भावरील अन्याय थांबायलाच हवा

१ मे १९६० रोजी महाराष्ट्राचे गठन झाले, त्यावेळी विदर्भाला वैदर्भीयांच्या इच्छेविरुद्ध महाराष्ट्रात समाविष्ट करण्यात आले होते. त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी विदर्भावर महाराष्ट्रात अन्याय होणार नाही, तर विदर्भाला झुकते माप दिले जाईल असा शब्द दिला होता. मात्र तो कधीच पाळला गेला नाही. विदर्भावर अन्याय कायम सुरूच राहिला आणि आजही तीच परंपरा सुरु आहे.
विदर्भावरील अन्यायाच्या परंपरेत आणखी एक पापकृत्य महाराष्ट्र सरकारने केले असल्याचे आज जाहीर झाले आहे. राज्यातील मान्यवरांची जयंती आणि पुण्यतिथी शासनातर्फे साजरी केली जाते, त्यासाठीदरवर्षी शासनातर्फे एक परिपत्रक निघत असते, त्या परिपत्रकात विदर्भाचे सुपुत्र असलेले महाराष्ट्राचे पहिले उपमुख्यमंत्री आणि दुसरे मुख्यमंत्री मारोतराव कन्नमवार यांच्या जयंती आणि पुण्यतिथीचा उल्लेखच नसल्याचे आढळून आले आहे.
आतापर्यंत महाराष्ट्र शासन विदभाला विकासनिधी देतांना किंवा नव्या संस्था नवे कारखाने देतांना अन्याय करीत होते, मात्र आता वैदर्भीयांना अनुल्लेखानेच मारायचे असे ठरवले आहे कि काय? अशी शंका येते आहे. मारोतराव कन्नमवार हे आधी नमूद केल्याप्रमाणे महाराष्ट्राचे पहिले उपमुख्यमंत्री आणि दुसरे मुख्यमंत्री म्हणून कार्यरत होते, त्याआधी त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात मोलाचे योगदान दिले होते. महाराष्ट्राचे गठन होण्यापूर्वी जुने सीपी अँड बेरार आणि नंतर मुंबई द्विभाषिक राज्य या दोन्हीमध्ये ते एक सक्रिय लोकप्रतिनिधी म्हणून काम करीत होते. अश्या मान्यवरांचा शासनाला विसर पडावा ही दुर्दैवी बाब तर आहेच पण शासकीय यंत्रणेची अक्षम्य चूक आहे. याबाबत संबंधितांवर कडक कारवाई व्हायला हवी.
विदर्भाच्या संदर्भात महाराष्ट्र शासनाचे कायम अन्याय करण्याचेच धोरण राहिले आहे. त्याचवेळी वैदर्भीयांनी विदर्भाचे वेगळे राज्य हवे, असे म्हटले तर मुंबईकरांच्या आणि पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांच्या नाकाला मिरची झोंबते. आम्हाला मराठी माणसाचे एक राज्य हवे, आणि अखंड महाराष्ट्र हवा असे महाराष्ट्रवादी म्हणतात. वेगळ्या विदर्भाची मागणी केली तर त्यांची तुलना काश्मीरमधील दहशतवाद्यांशी केली जाते. मात्र विदर्भावर अन्याय करणे कधीच थांबत नाही. जर विदर्भाला चव्हाणांनी दिलेल्या शब्दानुसार झुकते माप दिले असते, तर ही वेळ आली नसती. मात्र वैदर्भीयांची कदरच करायची नाही,या से या महाराष्ट्रवाद्यांचे धोरण आहे.
हे धोरण महाराष्ट्रवाद्यांना महागस्त पडू शकते, याची जाणीव ठेवायला हवी. वैदर्भीय माणूस तसाही सोशिक आणि शांत आहे, मात्र तो संतापला तर तिसरा डोळा उघडेल, याची जाणीव ठेवावी आणि विदर्भावरील अन्याय थांबवावा, इतकेच इथे सुचवायचे आहे.

अविनाश पाठक

Leave a Reply