रेशन दुकानात मिळणाऱ्या धान्याचा काळाबाजार करणाऱ्या तिघांना अटक, २० लाखाचा तांदूळ जप्त

नागपूर : ७ जानेवारी – गोरगरिबांना स्वस्त दरात मिळणाऱ्या धान्यांवर काळाबाजारी करणाऱ्यांची वक्रदृष्टी पडली आहे. रेशनमधून मिळणाऱ्या धान्यांची काळाबाजारी वाढली असून, पोलिसांनी एका गोदामात टाकलेल्या छाप्यात मोठय़ा प्रमाणात गोरगरिबांच्या हक्काचा तांदूळ आढळून आला. हुडकेश्वर पोलिसांनी या प्रकरणी ८९0 गोणी तांदूळ जप्त केला. या तांदळाची किंमत अंदाजे २0 लाख ५१ हजार ५00 रु. असल्याचे सांगण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली.
पोलिसांना दिघोरी येथील एका गोदामात मोठय़ा प्रमाणात रेशन दुकानातील तांदूळ असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार हुडकेश्वर पोलिसांनी उपरोक्त ठिकाणी छापामार कारवाई केली. या गोदामातून ट्रक क्र. एमएच ४९ डी २८६४ तांदूळ घेऊन निघत होता.
या गोदामातून मोठय़ा प्रमाणात साठवणूक केलेला सार्वजनिक धान्य वितरण प्रणालीचा ८९0 गोणी तांदूळ नागपूर पोलिसांनी जप्त केला. माहितीच्या आधारावरून पोलिसांनी सकाळी ४ च्या सुमारास या गोदामावर छापा टाकला. या कारवाईत पोलिसांना ४४५ क्विंटल तांदळाचा साठा आढळून आला. शासनाकडून रेशनिंगच्या दुकानात २ रुपये किलो दराने मिळणारा तांदूळ ८ ते १0 रुपये किलोप्रमाणे खरेदी केला जातो व पुढे हाच तांदूळ चांगल्या तांदळात मिसळून बाजारात विक्री केल्या जाते.
सदर जप्त केलेला तांदूळदेखील गोंदिया जिल्हय़ात नेऊन एका राईस मिलमध्ये पॉलिश करून चांगल्या तांदळात मिसळण्यात येणार होता. परंतु, या तांदळाची डिलेव्हरी होण्यापूर्वी पोलिस या ठिकाणी पोहोचले.
या प्रकरणी पोलिसांनी आरोपी अहमद रजा मोहम्मद कासीम, अमोल शांतीदास लंबाडे, मनोज हरिराम उईके यांना अटक केली आहे. दरम्यान, अलीकडे रेशन दुकानात मिळणाऱ्या धान्याचा मोठय़ा प्रमाणात काळाबाजार होत असून यावर लागलीच नियंत्रण आणण्याची गरज आहे.

Leave a Reply