बकुळीची फुलं : भाग -३ – शुभांगी भडभडे

मी तिसरीत असतांनाच देवीची साथ आली होती . माझे वडील त्यावेळी नागपूरला शेतीच्या कामासाठी आले होते . घरी होती आई आणि मी माझे तीन भाऊ .
आई सोडून सर्वांनाच ताप आला आणि तिघांचा ताप तीन चार दिवसांत उतरला . पण माझ्या अंगावर तीन दिवसांनी गोल गोल छोटे फोड आले .
आईनी कुणाला तरी बोलावलं.
मला देवी आल्या होत्या . ह्या गोल गोल फोडांना देवी का म्हणतात हे मी आईला त्याही स्थितीत विचारलं .
प्रचंड ताप आणि पहाता पहाता त्या चार आणे एवढ्या झाल्या . डोंबिवलीत कुणी नातेवाईक नव्हते . वडीलांना तार केली पण वडीलांना शेतावर तार मिळाली नाही . माझ्या तीन भावांना ती दूर ठेवत होती . शेजारच्या काकू यायच्या म्हणायच्या . ” ह्या देवी २१ दिवस अशाच फुगत राहतील आणि २१ दिवसांनी त्या आपोआप उतरू लागतील . “
आई सारं धीरांनी करत होती त्या देवीवर कुठलंही औषध त्यावेळी नव्हतं
आज देवीचं पूर्णपणे निर्मूलन झालंय आता अत्यंत कमी प्रमाणात येतात त्या कांजण्या .
पण त्यावेळी अंगावर तीळ ठेवायला जागा नव्हती. इतक्या देवी आल्या होत्या.
तापात मी शांत असायची . आईची काळजी वाढायची पोरगी जगेल का हा प्रश्न डोळ्यातून ओघळायचा.
एकवीस दिवस संपले .
आता पुन्हा एक परीक्षा होती आईची . किंचितही खाजवलं की त्यातून पस यायचा आणि पुन्हा त्या ठिकाणी देवी यायची .
जसजसे दिवस जाऊ लागले मला खुप खाज सुटत होती. आईनी कडूलिंबाची डहाळी आणली . ती हळूहळू माझ्या देवी वरून फिरवायची .
तरीही मी कमालीची अस्वस्थ . आणि तिने रामायणाच्या, महाभारताच्या, पुराण कथा , ऋषींच्या कथा , हितोपदेश , साने गुरुजी , य.गो जोशी , पंडीत महादेव शास्त्री यांच्या कथा सांगायला सुरूवात केली. आणि कथा ऐकता ऐकता मी खाजवणं विसरायची
आणि एक दिवस मी
ब-यापैकी बरी झाले . ४२ दिवस अंगावर दुखणं असल्याने थकून गेले होते . आईचा हात धरून चालत होते .
आणि वडील आले . तार किंवा पत्र मिळालं म्हणून नाही तर नेहमी जाऊन येत तसे.
ते आईला म्हणाले
” सावित्रीने सत्यवानाला मृत्यूच्या दारातून आणलंय असं नाही . तू आपल्या मुलीसाठी सावित्री झालीस “
आजही ते‌ वाक्य माझ्या मनात कोरलं गेलंय . कदाचित देवी आल्या नसत्या तर आज मी लेखिका ही झाले नसते . कथांचे संस्कार आणि तेही विविध प्रकारचे व्हावेत ही देवीची कृपा.
आणि देवी अंगावर आपल्या दृढ मुद्रा उमटतात .
पण शरीर व्यापून टाकणारी देवी , प्रत्यक्षदेवी होऊनच मला वरदान द्यायला आली होती. आणि परीक्षा झाली होती मातृत्वाची . आणि अंगावर कोणतीच मुद्रा न ठेवता परतली मनात कायम सरस्वतीचं शब्दातीत रूप ठेऊन.
प्रत्येकच आई अशा विविध जीवघेण्या परीक्षा देत असते .
आज आई नाही . जिथे कुठे असेल हे वाचून तिच्या नेत्रात श्रावण भाद्रपद झरझर झरतील नक्कीच.

शुभांगी भडभडे

Leave a Reply