निर्बंधांच्या नावाखाली जनतेमध्ये दहशत निर्माण केली जात आहे – अतुल भातखळकर

मुंबई : ७ जानेवारी – राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढला आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. गुरुवारी एकट्या मुंबईमध्ये वीस हजारांपेक्षा अधिक रुग्ण आढून आले आहेत. दरम्यान वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा राज्य सरकारकडून काही निर्बंध लागू करण्यात आले आहेत. यावरून भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. तीनही पक्षांच्या नेत्यांमध्ये एकवाक्यता नसल्याचे अतुल भातखळकर यांनी म्हटले आहे.
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. कोरोनामुळे पुन्हा एकदा सरकारकडून निर्बंध लावण्यात येत आहेत. मात्र निर्बंध नेमके काय असतील याबाबत महाविकास आघाडीमधील नेत्यांंमध्ये एकवाक्यता नसल्याची टीका अतुल भातखळकर यांनी केली आहे. रावणासारख दहा तोंडाने बोलणारे आणि चालणारे हे सरकार आहे. निर्बंधांच्या नावाखाली जनतेमध्ये दहशत निर्माण केली जात असल्याचे भातखळकर यांनी म्हटले आहे. कोरोनामुळे जर मुंबईत लॉकडाऊनची घोषणा केली, तर जनतेचे अतोनात नुकसान होणार आहे. या नुकसानाची जबाबदारी कोण घेणार? लॉकडाऊनमध्ये नुकसान झाल्यास सरकारने मदत करावी अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली.
दरम्यान राज्यात अनावश्यक गोष्टींमुळे कोरोना संसर्ग वाढत आहे. ज्या गोष्टींमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका आहे, त्यावर बंदी आणली जाईल, तसेच वेळोवेळी कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्याचे कम सुरू असून, आवश्यक असल्यास मुख्यमंत्र्यांच्या पातळीवर निर्बंध अधिक कडक करण्यात येऊ शकतात. नागरिकांनी कोरोना नियमांचे काटेकोर पालन करावे. बाहेर पडताना मास्क घालावा. गर्दी टाळावी, घरी आल्यानंतर हात स्वच्छ धुवावेत. कोरोनाची लक्षणे आढल्यास तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधावा असे आवाहन आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केले आहे.

Leave a Reply