गाडीपर्यंत पोहोचलेले आंदोलक होते, तर त्यांच्या हातात भाजपाचे झेंडे का? – श्रीनिवास बी. व्ही.

नवी दिल्ली : ७ जानेवारी – पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेमध्ये झालेल्या त्रुटीचा वाद आता थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचला आहे. या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. न्यायालयात सुनावणीदरम्यान काही पुरावे मांडले जाण्याची शक्यता आहे. मात्र, त्याआधीच सोशल मीडियावर त्या घटनेसंदर्भातले व्हिडीओ व्हायरल होऊ लागले आहेत. त्यामुळे नेमकं तेव्हा काय घडलं होतं? याविषयीचे दावे केले जात आहेत. यापैकी एक दावा म्हणजे मोदींच्या ताफ्याजवळ पोहोचलेल्या व्यक्ती या शेतकरी आंदोलक नसून भाजपाचेच कार्यकर्ते होते हा आहे. या दाव्याच्या समर्थनार्थ काही व्हिडीओ देखील आता व्हायरल होऊ लागले आहेत. या व्हिडीओंमुळे सोशल मीडियावर तुफान चर्चा सुरू झाली आहे.
गुरुवारी व्हायरल झाला पहिला व्हिडीओ!
गुरुवारी यासंदर्भातला एक व्हिडीओ पोस्ट करून युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बी. व्ही. यांनी काही प्रश्न उपस्थित केले होते. “मोदींच्या गाडीपर्यंत पोहोचलेले आंदोलक होते, तर त्यांच्या हातात भाजपाचे झेंडे का होते? पंजाब पोलिसांनी यांना रोखलं नाही तर केंद्र सरकारच्या अख्त्यारित असणाऱ्या एसपीजी सुरक्षारक्षकांनी त्यांना गाडीजवळ का येऊ दिलं? आयबी अधिकारी कुठे होते? ते मोदी जिंदाबादच्या घोषणा का देत होते?” असे सवाल त्यांनी केले आहेत.
दरम्यान, श्रीनिवास यांनी हा व्हिडीओ शेअर केल्यानंतर आज त्यासंदर्भातले अजून काही व्हिडीओ समोर आले असून यामध्ये काही व्यक्ती थेट मोदींच्या गाडीजवळ पोहोचून घोषणाबाजी करताना दिसत आहेत. या लोकांच्या हातात भाजपाचे झेंडे असून ते भाजपा जिंदाबादच्या घोषणा देत आहेत. हे सर्वजण भाजपा समर्थकच असल्याचा दावा आता केला जात आहे. त्यामुळे नेमका पंतप्रधानांच्या सुरक्षेचा प्रोटोकॉल कुणी मोडला? असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे.
दरम्यान, एकीकडे मोदींच्या गाडीजवळचा एक व्हिडीओ समोर आल्यानंतर या फ्लायओव्हरवर नेमकी काय परिस्थिती होती, याचा दुसरा व्हिडीओ देखील व्हायरल होत आहे. यामध्ये गाड्यांची लांबच लांब रांग दिसत असून मोदींच्या या ताफ्यामध्ये एसपीजी कमांडोंच्या वर्तुळात पंतप्रधानांची गाडी देखील दिसत आहे.
या व्हिडीओमध्ये पंतप्रधानांच्या ताफ्यासमोर आसपास उभे असलेले पंजाब पोलीस देखील दिसत असून त्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी पोस्ट या व्हिडीओसोबत शेअर करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी देखील भाजपा समर्थक पंतप्रधानांच्या गाडीजवळ कसे पोहोचले? असा सवाल उपस्थित केला आहे.

Leave a Reply