खा. बाळू धानोरकर उतरले कबड्डीच्या मैदानात, व्हिडीओ व्हायरल

यवतमाळ : ७ जानेवारी – काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांनी चक्क कबड्डीच्या मैदानात उतरून कबड्डी खेळण्याचा आनंद घेतला. ते केवळ मैदानात उतरले नाहीत, तर त्यांनी एक गडी देखील बाद केला. बाळू धानोरकर हे कबड्डी खेळत असल्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल झाला असून, नेटकऱ्यांनी धानोरकर यांच्या चपळाईचे कौतुक केले आहे. धानोरकर यांनी मोठ्या चपळाईने प्रतिस्पर्धी गटातील एका खेळाडूला बाद केले.
मोरगाव तालुक्यातील मार्डी ग्रामपंचायत आणि न्यू फ्रेंड्स क्रीडा मंडळ मार्डी यांच्या वतीने गावात कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला प्रमुख पाहुणे म्हणून काँग्रेस खासदार बाळू धानोरकर हे उपस्थित होते. या स्पर्धेमध्ये जय जनन्नाथबाबा क्रीडा मंडळ आणि न्यू फ्रेंड्स क्रीडा मंडळ मार्डी यांच्यात सामना सुरू असताना, धानोरकर यांनी अचानक मैदानात एन्ट्री घेतली. ते सामन्यात केवळ उतरलेच नाहीत तर त्यांनी एक गडी देखील बाद केला. या निमित्ताने धानोरकर यांच्यामध्ये लपलेल्या खेळाडूचे उपस्थितांना दर्शन झाले.
दरम्यान बाळू धानोरकर यांचा कबड्डी खेळतानाचा हा व्हिडीओ काही क्षणातच सामाजिक माध्यमांवर तुफान व्हायलर झाला. नेटकऱ्यांनी धानोरकर यांचे कौतुक केले आहे. धानोरकर हे या कार्यक्रमासाठी खास उपस्थित होते. यावेळी त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधत समस्या जाणून घेतल्या. ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा यावेळी सत्कार देखील करण्यात आला.

Leave a Reply