कामानिमित्त नागपूरला आलेल्या तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न, दीड महिन्यांनंतर तरुणीने दाखल केली तक्रार

नागपूर : ७ जानेवारी – कंपनीच्या कामानिमित्त आलेल्या तरुणीवर नागपुरातील एका प्रॉपर्टी डिलरने अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपीनं शहर फिरवण्याच्या बहाण्याने तरुणीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. पण पीडित प्रसंगावधान दाखवत आरडाओरडा केल्याने मोठा अनर्थ टळला आहे. ही संतापजनक घटना घडल्यानंतर जवळपास दीड महिन्यानंतर तरुणीने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
राजेंद्र विशंभर थोरात असं अटक केलेल्या ५५ वर्षीय आरोपीचं नाव आहे. तो वर्धा मार्गावर राहतो. तर त्याचा एक मित्र मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथे राहात असून त्याची एक कंपनी आहे. संबंधित मित्राच्या कंपनीत २२ वर्षीय पीडित तरुणी नोकरीला आहे. नोव्हेंबर महिन्यात पीडित तरुणी कंपनीच्या कामानिमित्त छिंदवाड्याला गेली होती. दरम्यान आरोपीनं आपल्या मित्राला फोन करून छिंदवाड्यात गूळ चांगला मिळतो, काही गूळ पाठव असं म्हटलं. त्यामुळे कंपनीच्या संचालकाने पीडित तरुणी पुन्हा वर्ध्याला जात असताना तिच्याकडे काही गूळ आणि आरोपीचा मोबाइल नंबर दिला.
त्यानुसार पीडित तरुणी २२ नोव्हेंबर रोजी दुपारी दोनच्या सुमारास मध्य प्रदेशातील एका बसस्थानकावर आली. तिने आरोपीला फोन करून गूळ घेऊन जाण्यास सांगितलं. यावेळी आरोपी याठिकाणी आपली कार घेऊन आला. पाहुणचार करण्याच्या बहाण्याने आरोपीनं पीडितेला सीताबर्डी येथील मोठ्या रेस्टॉरंटमध्ये नेलं. याठिकाणी खाऊ पिऊ घातल्यानंतर आरोपीनं शहर फिरवण्याच्या बहाण्याने पीडितेला सेमिनरी हिल्स परिसरात घेऊन गेला. याठिकाणी आरोपीनं कारमध्येच पीडित तरुणीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. पण पीडितेनं प्रसंगावधान दाखवत आरडाओरडा केला.
त्यामुळे घाबरलेल्या आरोपीनं पीडितेला पुन्हा बसस्थानकावर आणून सोडलं. यानंतर पीडित तरुणी आपल्या गावाला निघून गेली. ती घाबरली असल्याने आणि बदनामीच्या भीतीने तिने घटनेची माहिती कोणालाच नाही दिली. पण त्यानंतर गावातील मित्र आणि कंपनीच्या संचालक अर्थातच आरोपीचा मित्र यांनी पीडित तरुणीला पाठबळ दिल्याने अखेर ४४ दिवसानंतर फिर्याद दाखल केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पण आरोपीनं असं काहीच केलं नसल्याचा दावा केला आहे. तसेच कंपनीचा संचालक मित्राकडे आपले काही पैसे आहेत. ते पैसे परत द्यायचे नसल्याने त्याने खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचं षडयंत्र रचल्याचं आरोपीचं म्हणणं आहे. या घटनेचा पुढील तपास सीताबर्डी पोलीस करत आहेत.

Leave a Reply