ओमायक्रॉन व्हेरिएंटला सौम्य समजण्याची चूक करू नका, तो प्राणघातकही आहे – डब्ल्यूएचओ चा इशारा

जिनिव्हा : ७ जानेवारी – गेल्या काही दिवसांपासून भारतासह जगभरात ओमायक्रॉन व्हेरिएंटचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. हा व्हेरिएंट प्राणघातक नसल्याचा दावा काहीजणांकडून केला जात आहे. मात्र यावर आता जागतिक आरोग्य संघटनेनं मोठी माहिती दिली आहे. ‘ओमायक्रॉन व्हेरिएंटला सौम्य समजण्याची चूक करू नका, तो प्राणघातकही आहे,’ असा गंभीर इशारा डब्ल्यूएचओ कडून देण्यात आला आहे. आधीच्या व्हेरिएंटप्रमाणे ओमायक्रॉनची बाधा झालेल्या रुग्णांना देखील रुग्णालयात दाखल करावं लागत आहे. परिणामी झपाट्याने रुग्णसंख्या वाढत असल्याने देशांच्या आरोग्य व्यवस्थेवर ताण पडत असल्याचंही डब्ल्यूएचओ कडून सांगण्यात आलं आहे.
डब्ल्यूएचओच्या क्लिनिकल मॅनेजमेंटच्या प्रमुख जेनेट डियाझ यांनी सांगितलं की, सुरुवातीच्या अभ्यासातून असं दिसून आलं आहे की, नोव्हेंबरमध्ये दक्षिण आफ्रिका आणि हाँगकाँगमध्ये आढळलेल्या ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे रुग्णालयात दाखल होण्याचा धोका डेल्टा व्हेरिएंटच्या तुलनेत कमी होता. तरुण आणि वृद्ध दोघांमध्ये संसर्गाचा धोका कमी असल्याचं दिसून आलं, असं त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.
जिनिव्हा येथील याच पत्रकार परिषदेत, जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस एडनॉम गेब्रियेसुस यांनी सांगितलं की, ” ओमायक्रॉन व्हेरिएंट डेल्टापेक्षा कमी प्राणघातक वाटत आहे. विशेषत: ज्यांनी लसीकरण केलेलं आहे, लोकांमध्ये ओमायक्रॉनची सौम्य लक्षणं जाणवत आहेत. याचा अर्थ असा होत नाही की, ओमायक्रॉन व्हेरिएंटला सौम्य म्हणून वर्गीकृत केलं जावं.” अतिगंभीर रुग्णांमधील 90 टक्के रुग्ण हे लसीकरण न झालेले असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं आहे.
याआधी आलेल्या कोरोना व्हेरिएंटप्रमाणे, ओमायक्रॉनचा संसर्ग झालेल्या लोकांना देखील रुग्णालयात दाखल करावं लागत आहे. यामध्ये अनेकांचे जीव देखील जात आहेत,” अशा इशारा देखील डब्ल्यूएचओ प्रमुखाने दिला आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णांबाबत त्यांनी सांगितलं की, जागतिक स्तरावर ओमायक्रॉन आणि डेल्टा या दोन्ही व्हेरिएंटची अनेक प्रकरणं समोर येत आहे. यामध्ये झपाट्याने वाढ होत असून आरोग्य यंत्रणांवर ताण निर्माण झाला आहे. आणि जगभरातील सरकारे 5.8 दशलक्ष लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार असलेल्या विषाणूला रोखण्याचा अतोनात प्रयत्न करत आहेत, असंही त्यांनी सांगितलं आहे.

Leave a Reply