ओंजळीतील फुलं : १० – महेश उपदेव

व्हीसीएची गॅलरी कोसळली

28 dec mahesh updeo final

खबरमधील माझे क्रीडा पान रोज चांगलेच गाजत होते. उदयोन्मुख खेळाडूंना न्याय मिळवून देण्यासाठी मी झगडत होतो. क्रीडा संघटनेतील राजकारणामुळे खेळाडूंवर अन्याय होऊ नये ही माझी पाहिलेपासूनची भूमिका होती. मी स्वतः खेळाडू असल्यामुळे खेळाडूवर अन्याय झाला तर त्याच्या मदतीला जाऊन त्याला न्याय मिळवून देत होतो.
१९९५ मध्ये नागपूरच्या व्हीसीए मैदानावर हिंदुस्थान विरुद्ध न्यूझीलंड हा एकदिवसीय सामना होता. एक दिवसीय सामन्याकरिता नागपूरसह मध्यप्रदेशातील क्रीडाप्रेमी व्हीसीए वर येत होती. एकदिवसीय सामन्याचा पहिला डाव संपायला काही मिनिटे बाकी असताना महिला क्रिकेटप्रेमी स्टेडियमच्या पूर्वेकडील गॅलरीतून खाली उतरायला लागल्या युवती बाहेर निघत असल्याचे पाहून स्टेडिअममध्ये बसलेले काही युवक हुल्लडबाजी करत त्यांच्या मागे निघाले. एकदम प्रेक्षकांचा लोंढा मुलींच्या मागे लागला. या गर्दीचा भार संरक्षक भिंत सहन न करू शकल्यामुळे एकेरी विटांची भिंत कोसळली यामुळे मुलींबरोबर काही प्रेक्षक गॅलरी कोसळल्यामुळे खाली पडले.
या दरम्यान मी प्रेस गॅलरीमध्ये सामन्यांचे वार्तांकन करीत बसलो होतो. अचानक अग्निशामक दलाची गाडी सायरन वाजवत स्टेडिअमजवळ आली. मला संशय आला. काहीतरी विपरीत घडले आहे. माझ्याबाजूला बसलेल्या सहकार्याला तू वार्तांकन सांभाळ मी बघून येतो असे सांगून अग्निशामक दलाच्या गाडीच्या मागे धावत घटनास्थळावर पोहोचलो. गॅलरी कोसळल्यामुळे बऱ्याच मुली जखमी झाल्या होत्या. घटनास्थळावर मी नगरसेवक गिरीश व्यास व छायाचित्रकार संगीत महाजन सर्वप्रथम तेथे पोहोचलो जखमींना मलब्याखालून बाहेर काढले. माझा शर्टाची रक्ताने माखला होता. अशा स्थितीत एकेक क्रीडाप्रेमीला बाहेर काढले. मढीची रेड्डी नावाची युवती घटनास्थळीच दगावली होती. तरीही रुग्णवाहिका येताच तिला मी रुग्णवाहिकेत ठेऊन रुग्णवाहिका मेयो हॉस्पिटलकडे रवाना केली. जखमी मलब्यातून क्रीडाप्रेमींना बाहेर काढणे सुरु असतानाच माधवी रेड्डी गेली असल्याची माहिती मिळाली. या दुर्घटनेत नऊ क्रीडाप्रेमी ठार झाले होते. तर ५० जण जखमी झाले होते. माधवी रेड्डी ही रामटेकच्या कवी कुलगुरू कालिदास अभियांत्रिकी महाविद्यालयाची विद्यार्थिनी होती. ती आपल्या मैत्रिणींसोबत सामना बघण्यासाठी आली होती. तिला बिचारीला हा सामना महागात पडला.

गडकरींनी हाताळली परिस्थिती

व्हीसीए स्टेडिअममध्ये एवढी मोठी घटना घडल्यानंतरही प्रेक्षकांना या घटनेची माहिती नव्हती. व्हीआयपी गॅलरीमध्ये नागपूरचे पालकमंत्री नितीन गडकरी सामना बघत होते. त्यांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी परिस्थिती हाताळली सरकारी यंत्रणा लावून पूर्ण मलबा साफ करून घेतला. त्याचवेळी ही माहिती स्टेडिअममध्ये पसरली असती तर मोठ्या प्रमाणात चेंगराचेंगरी होऊन अनेकांचे जीव गेले असते. गडकरींनी प्रसंगावधान दाखवत निर्णय घेऊन जखमींना त्वरित रुग्णालयात पाठविले. त्यामुळे गोंधळ उडाला नाही. प्रेस गॅलरीमध्ये बसलेल्या क्रीडा पत्रकारांना ही माहिती उपहारानंतर कळली. तोपर्यंत वातावरण शांत झाले होते.
या दुर्घटनेत माधवी रेड्डी हिच्यासह तीन जणांचा घटनास्थळी मृत्यू झाला होता. विक्रम बोरीकर, कमलाकर देशपांडे, यांचा घटनास्थळी मृत्यू झाला होता. तर अन्य सहा जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेचा मी साक्षीदार होतो. पोलिसांनी केलेल्या पंचनाम्यात माझे नाव होते. स्टेडियमची संरक्षक भिंत एकेरी विटेची होती. त्यात सळाखी नसल्यामुळे. मागून आलेल्या गर्दीचा भार भिंत सहन करू न शकल्याने ही घटना घडली होती. व्हीसीए चे सचिव गोपाळराव केळकर व अध्यक्ष प्रभाकरराव मुंडले यांच्याविरोधात सदर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता. मी सत्यस्थिती पोलिसांना कथन केल्यामुळे व्हीसीए चे पदाधिकारी या प्रकरणात वाचले. नाहीतर त्यांना शिक्षा झाली असती.
व्हीसीए ची गॅलरी कोसळून ९ ठार ५० जखमी या मथळ्याखाली बातमी माझ्या नावासहित सामना व महाराष्ट्र टाइम्समध्ये लीड म्हणून प्रकाशित झाली होती.
गोवारी हत्याकांड, व्हीसीएची गॅलरी कोसळली या दोन घटना माझ्या आयुष्यात वेदना देणाऱ्या ठरल्या दोन्ही घटना माझ्या डोळ्यासमोर बघितल्या या दोन्ही घटना मी कधीच विसरू शकत नाही.
क्रीडा वृत्तबरोबर गुन्हेगारी वृत्ताच्याही बातम्या मी देत होतो. नागपूरकमध्ये एका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकाने आपण केंद्रीय दक्षता आयोगाचा सदस्य असल्याचे सांगून नागपूरच्या सनदी अधिकाऱ्यांना चुना लावल्याची बातमी प्रकाशित केली. “पुंडलिकाच्या विटेवर नागपुरातील विठ्ठल” या मथळ्याखाली माझी बातमी प्रकाशित झाली. हा विठ्ठल म्हणजे अभय पुंडलिक नावाचा स्वयंसेवक होता. देवेंद्र फडणवीस यांच्या घराजवळील त्रिकोणी पार्क मधील एका फ्लॅटमध्ये राहत होता. अभय पुंडलिकाने दक्षता आयोगाचा सदस्य असल्याचे सांगून नागपूरचे पोलीस आयुक्त प्रवीरकुमार चक्रवर्ती यांना गंडा घालण्याचा प्रयत्न केला. त्यातच तो फसला. या घटनेनेही नागपुरात एकच खळबळ माजली होती.
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात आजपर्यंत विधानभवनावर दोन भव्य मोर्चे धडकले आहे. एक मोर्चा शरद पवार यांनी काढलेला शेतकऱ्यांचा बैलबंडी मोर्चा होता. तर दुसरा मोर्चा म्हणजे राज ठाकरे यांनी भारतीय विद्यार्थी सेनेच्या वतीने बेरोजगार युवकांचा मोर्चा काढून विधानभवनावर धडक दिली होती. हा मोर्चा इतका प्रचंड होता कि या मोर्च्याचे एक टोक रेशीमबाग मैदानावर होते तर दुसरे टोक विधानभवनाजवळील झिरो माइल्सवर होते. या मोर्चाचे वार्तांकन करण्याचीही संधी मला मिळाली.

जय महाराष्ट्र

महेश उपदेव

Leave a Reply