उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी भाजप नगरसेवक संदीप म्हात्रे यांना अटक

मुंबई : ७ जानेवारी – राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासंबंधी आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी भाजपाचे माजी नगरसेवक संदीप म्हात्रे यांना अटक करण्यात आली आहे. शिवसैनिकांनी कोपरखैरणे पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर भाजपाचे माजी नगरसेवक संदीप म्हात्रेंना अटक करण्यात आली. संदीप म्हात्रे यांनी ट्विटर आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून उद्धव ठाकरेंबाबत आक्षेपार्थ मजकूर टाकला होता. संदीप म्हात्रेंवर यापूर्वीही गंभीर गुन्हे दाखल आहेत.
संदीप म्हात्रे यांनी गुरुवारी ट्विटर आणि व्हॉट्सअपवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख करत आक्षेपार्ह मजकूर पोस्ट केला होता. या ग्रुपमध्ये काही शिवसैनिकदेखील होते. त्यांनी यावर आक्षेप घेतला. यानंतर हा वाद थेट पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचला.
वाद जास्त चिघळत असल्याने पोलिसांनी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. यानंतर रात्रीच ताब्यात घेऊन अटक करण्यात आली अशी माहिती परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिली आहे.
भाजपाचे महाराष्ट्र सोशल मीडिया प्रभारी जितेन गजारिया यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह ट्वीट केल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. शिवेसना याविरोधात आक्रमक झाली असून सायबर सेलकडे तक्रार केली. यानंतर मुंबई पोलीस क्राइम ब्रांचच्या सायबर सेलने जितेन गजारिया यांना समन्स बजावलं होतं. जितेन गजारिया यांनी बीकेसमध्ये पोलीस ठाण्यात हजेरी लावत आपला जबाब नोंदवला आहे.

Leave a Reply