आ. राजू कारेमोरे यांची आमदारकी धोक्यात, माजी आमदार चरण वाघमारेंनी दाखल केली तक्रार

भंडारा : ७ जानेवारी –मोहाडी-तुमसर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजू कारेमोरे यांच्यासाठी नववर्षाची सुरुवात चांगली झाली नाही. एक अडचण संपत नाही तर दुसऱ्या अडचणीला त्यांना सामोरे जावे लागत आहे. पोलिस स्टेशनमध्ये शिवीगाळ केल्यानंतर त्यांना तुरुंगाची हवा खावी लागली. हे कमी होते की काय म्हणून आता त्यांची आमदारकी धोक्यात आली आहे. माजी आमदार चरण वाघमारेंच्या तक्रारीनंतर त्यांच्यावर ही वेळ आली आहे.
आमदार राजू कारेमोरे यांनी शासनासोबत करार करून धान भरडाईचे कंत्राट मिळवून लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1951 चे उल्लंघन केले़ आहे. याप्रकरणी माजी आमदार चरण वाघमारे यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे लेखी तक्रार केली़ आहे. यावर राज्यपालांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून अहवाल मागविला़ असून याप्रकरणी केंद्रीय निवडणूक आयोगाने भंडारा जिल्हाधिकाऱ्यांकडून खुलासा मागविला आहे. त्यामुळे राजू कारेमोरे यांची आमदारकी धोक्यात आली आहे़. पोलिसांना शिवीगाळ केल्याप्रकरणी अटक झाल्याने आमदार राजू कारेमोरे अडचणीत आले असताना लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1951चे उल्लंघन केल्याप्रकरणी आमदारकी धोक्यात आल्याने त्यांच्या अडचणींत वाढ झाली आहे़
2019 च्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत मोहाडी-तुमसर मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार राजू माणिकराव कारेमोरे निवडून आले़ आहेत. लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1951 नुसार लोकसेवक पद धारण केल्यानंतर लाभाचे पद किंवा शासनासोबत कंत्राट, करारनामा किंवा कोणतेही लाभ मिळेल, असे कार्य करता येत नाही़. मात्र, आमदार राजू कारेमोरे यांनी स्वत:च्या नावे फर्म असलेल्या कंपनीसोबत 2019-20 व 2020-21 मध्ये शासनासोबत व्यवसाय करण्यासाठी धान भरडाई करण्याचा करारनामा केला़. नोटरी करताना पणन महासंघातर्फे जिल्हा पणन अधिकारी, शासनाकडून जिल्हा पुरवठा अधिकारी व आर.के. राईस उद्योग मोहगाव देवी यांच्याकडून आमदार राजू कारेमोरे यांनी करार केला आहे़. या करारनाम्यानुसार 1 नोव्हेंबर 2019 ते 29 ऑक्टोबर 2020 च्या कालावधीत 1 लाख 94 हजार 166 क्विंटल तर 9 एप्रिल 2021 ते 20 मे 2021 ला कालावधीत 27 हजार 336 क्विंटल धानाची उचल करून भरडाई केली आहे़. याची शासनस्तरावर यांची स्पष्ट नोंद आहे़. त्यामुळे आमदार राजू कारेमोरे यांनी शासनासोबत करार करून धान भरडाईचे कंत्राट मिळवून लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1951 चे उल्लंघन केल्याचे निष्पन्न झाले आहे़.
याबाबत माजी आमदार व भाजप नेते चरण वाघमारे यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. राज्यपाल महोदयांनी माजी आमदार चरण वाघमारे यांच्या तक्रारीची दखल घेत केंद्रीय निवडणूक आयोगाकडून अहवाल मागविला़ असून आयोगाने देखील याबाबत भंडारा जिल्हाधिकाऱ्यांकडून या तक्रारीसंबंधी शासकीय स्तरावरील कारवाईसंदर्भात तसेच करारनाम्यासंदर्भात खुलासा मागविला़ आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडून करारनाम्यासंदर्भातील अहवाल निवडणूक आयोगाकडून कारवाईसाठी राज्यपालांकडे प्रकरण जाणार असल्याने यावर काय निर्णय लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे़. करारनाम्यात आमदार राजू कारेमोरे यांच्या नावाचा स्पष्ट उल्लेख आहे.
राज्यात केंद्रीय धान खरेदी योजनेंतर्गत खरीप हंगाम 2019-20 तसेच रब्बी हंगाम 2020-21 मध्ये शासकीय आधारभूत किंमत धान्य खरेदी योजनेंतर्गत धानाची भरडाई करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत 12 डिसेंबर 2019 ला समन्वय समितीची बैठक पार पडली़ या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिलेल्या आऱ के़ राईस उद्योग मोहगाव देवी राजू माणिकराव कारेमोरे यांच्यासोबत 28 फेब्रुवारी 2020 ला नोटरी करून करारनामा केल्याचे सिद्ध झाले़. या करारनाम्याप्रमाणे 1 नोव्हेंबर 2019 ते 29 ऑक्टोबर 2020 च्या कालावधीत 1 लाख 94 हजार 166 क्विंटल धानाची उचल करून भरडाई केली़.
राज्यात विकेंद्रित धान खरेदी योजनेंतर्गत खरीप हंगाम 2020-21 तसेच रब्बी हंगाम 2021-22 मध्ये शासकीय आधारभूत किंमत धान्य खरेदी योजनेंतर्गत खरेदी केलेल्या धानाची भरडाई करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत 14 डिसेंबर 2020 ला समन्वय समितीच्या बैठक पार पडली़. या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिलेल्या आऱ के. राईस उद्योग मोहगाव देवी प्रोप्रा. आमदार राजू माणिकराव कारेमोरे यांच्यासोबत 24 डिसेंबर 2020 ला नोटरी करून करारनामा केल्याची नोंद आहे़. या करारनाम्याप्रमाणे 9 एप्रिल 2021 ते 20 मे 2021 ला कालावधीत 27 हजार 336 क्विंटल धानाची उचल करून भरडाई केली आहे़. सदर करारनाम्यात आमदारांच्या मालकीच्या राईस मिलसोबत करार करण्यात आल्याचे सिद्ध झाल्याने कारेमोरे यांच्यावर कारवाई अटळ असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे ऐन स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या तोंडावर आमदार राजू कारेमोरे यांच्या अडचणींत वाढ झाली आहे. एकीकडे पोलिस शिवीगाळ प्रकरण, तर दुसरीकडे आमदारकी धोक्यात, अशा दुहेरी संकटात आमदार कारेमोरे सापडले आहेत. या प्रकरणात उत्तर देताना त्यांच्या नाकी नऊ येणार, हे मात्र निश्‍चित.

Leave a Reply