नाना पटोलेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी तोंड सांभाळून बोलावे – चंद्रकांत पाटील यांचा इशारा

मुंबई : ७ जानेवारी – ‘पंजाबमध्ये पंतप्रधान मोदी सुरक्षेबाबत आज घडलेल्या गंभीर घटनेला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नौटंकी म्हणणे निषेधार्ह आहे. नौटंकी करणे हा नाना पटोले यांचा स्वभाव आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी तोंड सांभाळून बोलावे’, असा इशारा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिलाय. पंतप्रधान मोदी हे पंजाब दौऱ्यावर असताना त्यांच्या सुरक्षेत मोठी चूक झाली. त्यामुळे मोदींना जवळपास 20 मिनिटे आपल्या गाडीतच बसून राहावे लागले. त्यानंतर ते आपल्या दौरा रद्द करत पुन्हा दिल्लीला परतले. या प्रकारामुळे भाजप आणि काँग्रेस नेत्यांमध्ये जोरदार राजकारण पाहायला मिळत आहे.
चंद्रकांत पाटील म्हणाले की, नाना पटोले यांनी विधानसभेच्या अध्यक्षपदाचा अचानक राजीनामा दिला. त्यानंतर वर्षभर निवडणूक लांबवून नियमबाह्य पद्धतीने निवडणूक घेण्याचा प्रयत्न करत राज्यपालांवर खापर फोडण्याचा त्यांच्या आघाडीचा प्रयत्न म्हणजे नौटंकी होती. नाना पटोलेंच्या राजकीय आयुष्यात नौटंकीचे अनेक प्रसंग आहेत. नौटंकी हा त्यांचा स्वभाव आहे. त्यांनी देशातील अत्यंत महत्त्वाच्या संवैधानिक पदावरील व्यक्तीच्या सुरक्षिततेबाबत काँग्रेस सरकारकडून गंभीर चूक झाली असताना त्याला नौंटकी म्हणणे निषेधार्ह आहे. पंतप्रधान मोदी यांच्याविषयी नाना पटोले यांनी तोंड सांभाळून बोलावे.
‘नाना पटोले यांनी पंतप्रधानांच्या सुरक्षाव्यवस्थेची तूलना राहुल गांधी किंवा प्रियंका गांधी यांच्याशी करणे हास्यास्पद आहे. राहुल गांधी अमेठीमध्ये लोकसभा निवडणूक हारलेले आहेत. तर प्रियंका गांधी अद्याप एकाही निवडणुकीत विजयी झालेल्या नाहीत. त्यांच्या सुरक्षेची तूलना देशातील महत्त्वाच्या पदावरील व्यक्तीच्या सुरक्षेशी करणे असा प्रकार नाना पटोलेच करू शकतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील अत्यंत लोकप्रिय पंतप्रधान असून ते जागतिक नेते आहेत, हे पटोले यांनी तुलना करताना विसरू नये’, असा जोरदार टोलाही पाटील यांनी लगावलाय.
तसंच ‘नाना पटोले यांनी पंतप्रधानांविषयी आज घडलेल्या घटनेबाबत बोलताना राहुल गांधी यांच्या गाडीवर झालेल्या कथित हल्ल्याची आठवण करून दिली आहे. अशी आठवण करून देऊन नाना पटोले यांना धमकी द्यायची आहे का, हे त्यांनी स्पष्ट करावे. आज मोदीजींच्या गाडीवर हल्ला होण्यासाठी पटोले यांच्या पक्षाच्या सरकारने ढिसाळपणा केला का, हे सुद्धा त्यांनी सांगावे’, असं आव्हानही त्यांनी दिलंय.

Leave a Reply