टँकरमधून गॅस गळती झाल्याने गिरणीतील ४ कामगारांचा गुदमरुन मृत्यू

सुरत : ६ जानेवारी – गुजरातमधील सुरतमध्ये गुरुवारी सकाळी मोठी दुर्घटना घडली. सचिन परिसरात असलेल्या विश्व प्रेम डाईंग अँड प्रिंटिंग मिलजवळ टँकरमधून गॅस गळती झाल्याने गिरणीतील चार कामगारांचा गुदमरुन मृत्यू झाला आहे, तर २५ हून अधिक जणांची प्रकृती चिंताजनक आहे.
सुरतमधीस सचिन परिसरात विश्व प्रेम डाईंग अँड प्रिंटिंग मिलमध्ये गुरुवारी सकाळी झालेल्या दुर्घटनेनंतर खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मिलजवळील नाल्यात एक टँकर चालक विषारी रसायनं टाकत होता. यावेळी त्यातून विषारी वायूची गळती सुरु झाली. त्यामुळे जवळच असलेल्या गिरणीच्या कर्मचाऱ्यांनाही लागण झाली.
सध्या या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे. पोलीस घटनास्थळी पोहोचून या प्रकरणाचा तपास करत आहेत. पीडितांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर परिसरात घबराट पसरली होती. प्राथमिक माहितीनुसार, गुदमरल्यामुळे चौघा जणांना प्राण गमवावे लागले.
याआधी गुजरातमधील अहमदाबाद येथील एका कपड्याच्या कारखान्यात रासायनिक टाकी साफ करताना चार मजुरांचा मृत्यू झाला होता. अहमदाबादच्या ढोलका येथील चिरीपाल ग्रुपच्या विशाल फॅब्रिक युनिटमध्ये हा अपघात झाला. या अपघातात गॅस गळती कुठून झाली, हे समजू शकले नव्हते.

Leave a Reply