भारताचा अव्वल फिरकी गोलंदाज हरभजन सिंगची सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा

जालंधर : २४ डिसेंबर – भारताचा अव्वल फिरकी गोलंदाज हरभजन सिंगने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून आज निवृत्ती जाहीर केली. २३ वर्ष व्यावसायिक क्रिकेट खेळल्यानंतर नाताळच्या पूर्वसंध्येला हरभजनने निवृत्तीची घोषणा केली. मूळचा जालंधरचा असलेल्या ४१ वर्षीय हरभजनने १०३ कसोटी, २३६ वनडे आणि २८ टी-२० सामन्यांमध्ये टीम इंडियाचे प्रतिनिधीत्व केले.
“सर्व चांगल्या गोष्टींना शेवट असतो. मला आयुष्यात सर्व काही देणाऱ्या क्रिकेटचा आज मी निरोप घेत आहे. माझा क्रिकेटमधला हा २३ वर्षांच प्रवास सुंदर आणि संस्मरणीय करणाऱ्या सर्वांचे मी आभार मानतो. मी मनापासून आभार मानतो” असे हरभजनने केलेल्या टि्वटमध्ये म्हटले आहे.
२०१६ मध्ये यूएई विरुद्धच्या टी-२० सामन्यात हरभजनने शेवटचे भारताचे प्रतिनिधीत्व केले होते. त्यानंतर तो फक्त देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांमध्ये खेळत होता. तो आयपीएलमध्ये खेळणे चालूच ठेवणार आहे. हरभजन सिंगने भारताकडून खेळताना नेहमीच दमदार कामगिरी केली आहे. कसोटी क्रिकेटमध्ये त्याने १०३ सामन्यात ४१७ विकेट घेतल्या. २३६ वनडे सामन्यात २२७ विकेट घेतल्या.
टी-२० या छोट्या फॉर्मेटमध्ये हरभजनने २८ सामन्यात २५ विकेट घेतल्या. आयपीएलमध्ये हरभजन आतापर्यंत १३ सीझनमध्ये १६३ टी-२० सामने खेळला आहे. २०२० च्या एकाच मोसमात तो मैदानात दिसला नव्हता. २६ च्या सरासरीने त्याने तिथे १५० विकेट घेतल्या आहेत. १८/५ ही त्याची सर्वोत्कृष्ट कामगिरी आहे.

Leave a Reply