“मार्शल ट्यून” नेच व्हायची रावत दाम्पत्याच्या दिवसाची सुरुवात – डॉ. तनुजा नाफडे

नागपूर : २२ डिसेंबर – भारतीय सुरावटीची मार्शल ट्यून ७ ऑक्टोबर २०१८ रोजी देशाला सर्वप्रथम समर्पित करण्यात आली. या मार्शल ट्युनचा लोकार्पण सोहळा दिल्ली येथील माणिक शॉ सेंटर येथे दिवंगत लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांच्या हस्ते पार पडला. याप्रसंगी त्यांनी संगीतबद्धतेबद्दल माझ्या कार्याचे तोंडभरून कौतुक केले. तेव्हा मला एका साहसी सैनिक आणि कर्मठ अधिकाऱ्याला गाण्याची देखील उत्तम जाण आहे, ही बाब प्रकर्षाने दिसून आली. महत्वाची बाब म्हणजे दररोज सकाळी ही मार्शल ट्यून ऐकून आमच्या दिवसाची सुरुवात होते, याचा रावत दाम्पत्याने त्यावेळी आवर्जून उल्लेख केला होता, असे सांगत संगीतज्ञा तनुजा नाफडे यांनी रावत यांच्याशी झालेल्या पहिल्या भेटीच्या आठवणींना उजाळा दिला.
रोटरी क्लब ऑफ नागपूर एलिट व महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा यांच्या संयुक्त विद्यमाने धनवटे सभागृहात दिवंगत लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत मधुलिका रावत आणि अपघातात मृत्यू झालेल्या इतर अधिकाऱ्यांना शंखनादातून श्रद्धांजली अर्पण केली. याप्रसंगी निवेदिका प्रभा देऊस्कर यांनी मुलाखतीद्वारे विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देतांना डॉ. नाफडे बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निवृत्त मेजर जनरल अच्युत देव तर प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र राष्ट्रभाषा समितीचे अध्यक्ष अजय पाटील, अविनाश पाठक, एड आनंद परचुरे व शुभंकर पाटील उपस्थित होते.
मुलाखतीद्वारे बोलतांना डॉ. नाफडे म्हणाल्या, २०१६ मध्ये महार रेजिमेंटला ७५ वर्षे पूर्ण होणार असल्याने रेजिमेंटच्या गौरवशाली इतिहास काव्य स्वरूपात रचण्यात आला. नवीन पिढीला प्रेरणा देण्यासाठी हे काव्य रचण्यात आले, हे काव्य संगीतबद्ध करण्यासाठी मेजर जनरल मनोज ओक यांनी मला विचारणा केली आणि देशासाठी काम करण्याची संधी मिळत असल्याने मी यासाठी लगेच होकार दिला. ६ नोव्हेंबर २०१६ रोजी संगीतबद्ध काव्याचे सादरीकरण झाले. त्यामुळेच मला भारतीय सुरावटीची मार्शल ट्यून संगीतबद्ध करण्याची संधी मिळाली आणि माझे जीवन सार्थक ठरले याचा मला अभिमान आहे, असेही त्या म्हणाल्या.
आपल्या अध्यक्षीय भाषणात अच्युत देव म्हणाले की, दिवंगत लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत हे आकाशाला गवसणी घालण्याचे स्वप्न पाहणारे, झपाटून काम करणारे एक तडफदार व्यक्तिमत्व होते. त्यांच्यामध्ये देशभक्तीची भावना प्रखर होती. त्यांनी देशाच्या सीमेवर पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर आणि स्वदेशी बनावटीच्या शस्त्र खरेदीसाठी कायमच आग्रह धरला.

Leave a Reply