संघ निवडीदरम्यान माझा विचार करू नये – हार्दिक पांड्याची निवडकर्त्यांना विनंती

मुंबई : २९ नोव्हेंबर – भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याला सध्या त्याच्या फिटनेसवर लक्ष केंद्रित करायचे आहे. म्हणूनच त्याने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या निवडकर्त्यांना त्याच्या नावाचा विचार करु नये, अशी विनंती केली आहे. “काही काळ माझा भारतीय संघासाठी विचार करु नये, कारण मी पूर्णपणे फिटनेस साधण्यावर लक्ष केंद्रित करत आहे”, असे त्याने निवड समितीला सांगितले आहे. पाठीच्या समस्येमुळे २०१९ मध्ये झालेल्या शस्त्रक्रियेनंतर पंड्या भारत आणि मुंबई इंडियन्स या दोन्ही संघांसाठी गोलंदाजी करू शकलेला नाही.
क्रिकइन्फोच्या वृत्तानुसार, त्याचे लक्ष गोलंदाजीमध्ये कमबॅक करण्यावर देखील आहे आणि त्याने निवडकर्त्यांना वेळ देण्यास सांगितले आहे. पांड्या हा टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाचा भाग होता, पण तो ५ सामन्यांत फक्त दोनदा गोलंदाजी करू शकला. ज्यामध्ये त्याला यश मिळाले नाही.
मागील काही काळापासून ऑलराउंडर हार्दिक पंड्या खास कामगिरी करत नसल्याचं दिसून येत आहे. एकेकाळी एकट्याच्या जीवावर सामना जिंकवणारा हार्दीक अलीकडे मात्र आऊट ऑफ फॉर्म असल्याचं दिसतं आहे. त्यात तो गोलंदाजीही करत नसल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. अशात आगामी आयपीएलच्या लिलावासंबधी नवी माहिती समोर आली असून सध्या आयपीएल खेळणारे संघ केवळ ४ खेळाडूंनाच रिटेन अर्थात संघात कायम ठेवू शकणार आहेत. त्यानुसार मुंबईचा संघ हार्दीकचा फॉर्म पाहता त्याला रिटेन करेल अशी शक्यता फार कमी आहे.

Leave a Reply