अच्छे दिन आणणाऱ्या लोकांनीच ‘महागाईचे दिन’ आणले – यशोमती ठाकूर यांचा केंद्र सरकारवर निशाणा

अमरावती : २१ ऑक्टोबर – देशात पेट्रोल-डिझेल सोबतच सिलेंडर, डाळी, भाज्यांचे भाव देखील कडाडले आहेत. दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या महागाईवरून महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. ‘अच्छे दिन’ आणणाऱ्या लोकांनीच ‘महागाईचे दिन’ आणले, असं म्हणत त्यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
“महागाई वाढवणारं सरकार केंद्रात सत्तेत आहे. मग कोथिंबीर काय आणि कांदे काय? डिझेल काय आणि पेट्रोल काय? सगळं काही महाग झालं आहे. अच्छे दिन आणणारे लोकं महागाईचे दिन आणतायत. यावर मी काय बोलू?,” असं म्हणत ठाकूर यांनी उपरोधिक पद्धतीने महागाईवर टीका केलीय.
“सिलेंडरचे भाव यासाठी वाढलेत कारण लोकांनी कमीत कमी स्वयंपाक करावा. तेलाचे भाव यासाठी वाढले आहेत कारण लोकांचं आरोग्य व्यवस्थित रहावं. डिझेल पेट्रोलचे भाव यासाठी वाढलेत की करोना काळात लोकांनी बाहेर पडू नये. अशी स्पष्टीकरणं केंद्र देणार असेल तर यांना वेगळ्या पद्धतीने उत्तर द्यावं लागेल,” असं ठाकूर यांनी म्हटलं आहे.

Leave a Reply