बाबा राम रहीमसह सर्व आरोपींना हत्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा

चंदिगड : १८ ऑक्टोबर – पंजाबमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. डेरा सच्चा सौदाचे प्रमुख बाबा राम रहीम यांना कोर्टानं आजन्म कारावासाची शिक्षा सुनावलीय. सेवादार रणजितसिंह याच्या हत्येप्रकरणी राम रहीम दोषी ठरले होते. त्यानंतर आज त्यांना शिक्षा सुनावण्यात आली. बाबा राम रहीम यांच्याबरोबरच त्यांच्या इतर पाच साथीदारांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलीय. विशेष म्हणजे कोर्टाने राम रहीम यांना ३१ लाख तर इतर चार आरोपींना प्रत्येकी ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
सीबीआयच्या स्पेशल कोर्टात गुरमीत राम रहीम यांना आजन्म जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. त्याचबरोबर इतर चार आरोपींना देखील जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. राम रहीम आणि त्यांच्या सहकाऱ्यांना कोर्टात 8 ऑक्टोबरलाच दोषी ठरवण्यात आलं होतं. पण कोर्टाने निकाल राखून ठेवला होता. कोर्टाकडून आज निकालाचं वाचन करण्यात आलं. त्याआधी हरियाणाच्या पंचकूला जिल्ह्यात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. तसेच जिल्ह्यात कमल १४४ लागू करण्यात आलं आहे.
रणजितसिंह यांची १० जुलै २००२ साली हत्या करण्यात आली होती. या हत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडून सुरु होता. सीबीआयने ३ डिसेंबर २००३ रोजी या प्रकरणी एफआयआर दाखल केली होती. गेल्या १९ वर्षांपासून या प्रकरणावर कोर्टात खटला सुरु होता. अखेर ८ ऑगस्टला या प्रकरणाचा युक्तीवाद संपला. त्यानंतर आज राम रहीमला आजन्म जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. विशेष म्हणजे याआधी राम रहीमला पत्रकार रामचंद्र छत्रपती यांच्या हत्येप्रकरणी देखील कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
राम रहीम सध्या आपल्या दोन अनुयांयीवर बलात्कार केल्याच्या आरोपांखाली २० वर्षाच्या कारावासाची शिक्षा भोगत आहे. त्याच्यावर अनेक आरोप आहेत. दरम्यान, राम रहीमशी संबंधित कोणत्याही प्रकरणावर सुनावणी दरम्यान सुरक्षा व्यवस्था वाढवली जाते. कारण ऑगस्ट २०१७ मध्ये मोठा हिंसाचार झाला होता. त्यावेळी राम रहीम कोर्टात दोषी ठरला होता. त्यानंतर मोठा हिंसाचार झाला होता. त्या हिंसाचारात जवळपास ३६ जणांचा मृत्यू झाला होता.

Leave a Reply