कृषीमालाला चांगला भाव मिळण्यासाठी कृषी मालाचे गुणात्माक उत्पादन गरजेचे – नितीन गडकरी

नागपूर : ९ ऑक्टोबर – विदर्भातील शेतकऱ्यांना त्यांच्या कृषी मालाला चांगला भाव मिळण्यासाठी कृषी मालाचे गुणात्मक उत्पादन, प्रोसेसिंग, पॅकेजिंग तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत त्याचे विपणन होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाह्तूक आणि महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांनी आज नागपूर मध्ये केले . कृषी आणि प्रक्रियाकृत अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण- अपेडा तसेच अँग्रोव्हिजन फाउंडेशन नागपूर यांच्यावतीने नागपूरमधील स्थानिक सेंटर पॉईंट हॉटेल येथे ‘विदर्भातील कृषिमाल भाजीपाला यांची निर्यात क्षमता’ यावर आधारित एका संपर्क कार्यक्रमाचे आयोजन आज करण्यात आलं होतं त्यावेळी मुख्य अतिथी म्हणून नितीन गडकरी बोलत होते . याप्रसंगी अपेडाचे अध्यक्ष डॉ. एम अंगामुथू ,नागपूरच्या आदिवासी विकास विभागाचे अप्पर आयुक्त रविंद्र ठाकरे, अँग्रोव्हिजन फाउंडेशनच्या सल्लागार मंडळाचे अध्यक्ष डॉ. सी. डी. मायी तसेच आयोजन सचिव रवी बोरटकर रमेश मानकर याप्रसंगी उपस्थित होते .
विदर्भातील फलोत्पादनाला चालना मिळण्यासाठी येथे पिकणारे संत्री-मोसंबी नींबू, बोर, सीताफळ यांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये चांगली मागणी आहे त्यांची टेबल फ्रूट म्हणून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आपण निर्यात केल्यास येथील शेतकऱ्यांना चांगला लाभ मिळणार आहे . जवाहरलाल नेहरू पोर्ट- जेएनपीटी द्वारे वर्धा येथील सिंदी ड्रायपोर्ट मधून सुद्धा वातानुकुलित फूड कंटेनरमध्ये ही संत्री थेट बांगलादेशच्या बाजारपेठेत निर्यात करण्याकरता सुद्धा प्रयत्न चालू आहे . या सुविधेमुळे संत्र्याच्या वाहतूक खर्चात कपात होउन त्याचा फायदा शेतकऱ्यांना होईल अशी माहिती नितीन गडकरी यांनी दिली .
शेतकऱ्यांना चांगल्या गुणवत्तेची रोपे देण्यासाठी केंद्रीय संत्री व लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्था – सीसीआरआय तसेच डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठाने पुढाकार घ्यावा . पंजाबराव कृषी विद्यापीठाच्या अमरावती रोडवरील ५५ एकर जागेवर दीडशे कोटी रुपयाचे ऍग्रो कन्व्हेन्शन सेंटर प्रस्तावित असून या ठिकाणी शेतकऱ्यांना प्रशिक्षण तसेच त्यांच्या निवासाची सुविधा निर्माण करण्यात येणार आहे यासाठी अपेडा तसेच पंजाबराव कृषी विद्यापीठाने मदत केली तर हे कन्व्हेंशन सेंटर लवकरच स्थापन होईल असेही त्यांनी सांगितले. पूर्व विदर्भ तसेच मेळघाट येथील आदिवासी भागात बनणारे मध तसेच इतर उत्पादनाचे निर्यात मूल्य ओळखून त्यांच्या निर्यातीचे सुद्धा प्रस्ताव सादर करावेत अशी सूचना गडकरी यांनी यावेळी केली . विदर्भातील मालगुजारी तलाव तसेच तळ्यामध्ये असणा-या झिंग्याची पॅकेजिंग आणि प्रोसेसिंग केल्यास येथील ढीबर समाजाला मोठ्या प्रमाणात रोजगार मिळेल असंही त्यांनी सांगितलं. नागपूर शहराला दोहा, कतार या शहराशी कनेक्टिव्हिटी असल्यामुळे अपेडाने येथील खाजगी विमान सेवेशी करार करून येथील कृषीउत्पादने सुद्धा तिथे निर्यात करण्यासाठीच्या संधीची पडताळणी करावी अशी सूचना सुद्धा त्यांनी केली.
विदर्भात दुग्ध उत्पादन आणि मासेमारीला खूप वाव आहे . दोनशे दुधाळ गाय तयार करण्यासाठीच्या प्रकल्पांना मदर डेअरी अनुदान देत आहे. यासंदर्भात माफसू आणि संबंधित यंत्रणांनी संशोधन वाढवण्याची गरज आहे असं त्यांनी सांगितलं .अपेडाचे एखादे विभागीय कार्यालय जर नागपुरात असले तर याचा फायदा विदर्भातील शेतक-यांना होईल असेही त्यांनी यावेळी सुचवलं. अपेडाचे अध्यक्ष डॉ. एम. अंगामुथू यांनी विदर्भामधील नागपूर व अमरावती येथील शेतकरी, शेतकरी उत्पादक संस्था, निर्यातदार यांच्यासोबत क्षमता निर्माण कार्यक्रमासाठी पुढाकार घेत असल्याचं सांगितले . विदर्भातील तांदूळ तसेच इतर आदिवासी उत्पादन यांना निर्यात मूल्य जास्त असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
याप्रसंगी केंद्रीय संत्री व लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्था – सीसीआरआय यांच्यासोबत अपेडाने सामंजस्य करारचे हस्तांतरणही केले. याद्वारे विदर्भातील संत्री तसेच लिंबूवर्गीय फळांच्या निर्यातीला चालना मिळणार आहे. या कार्यक्रमाला निर्यातदार , शेतकरी उत्पादन संघटना तसेच विभागातील शेतकरी आणि कृषी विभागाचे अधिकारी पदाधिकारी उपस्थित होते

Leave a Reply