यवतमाळात वीज पडून भावाचा मृत्यू तर बहीण जखमी

यवतमाळ : ८ ऑक्टोबर – दिग्रस तालुक्यातील पारवा येथे काल दुपारी दीड वाजताच्या दरम्यान अचानक आलेल्या परतीच्या पावसाने पांढुर्णा येथील रहिवासी असलेले मनोहर बदू चव्हाण (वय ३५)रा.पांढुर्णा हा युवक वीज पडून जागीच ठार झाला असून बहीण शोभा दत्ता राठोड (वय ३२)ही महिला वीज पडून गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. तिला पुसद येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरु आहेत. मनोहर बद्दू चव्हाण हा विवाहित असून तो मोलमजुरीचे काम करून आपल्या कुंटुबाचा उदरनिर्वाहाकरिता होता आज दुसर्यांच्या शेतात मजुरीच्या कामासाठी गेला असतांना परतीच्या पाऊस विजेच्या कडकडाटासह अचानक सुरू झाल्याने कोसळलेल्या विजेने मनोहरचा बळी घेतला तर बहीण गंभीर जखमी झाली आहे. घरचा कर्ताधर्ता, कुटुंब प्रमुख मनोहरचा मृत्यू झाल्याने त्याच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मनोहरच्या पाठीमागे त्याची वृद्ध आई, वडील, पत्नी, व पाच मुली असा आप्त परिवार आहे. त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Reply