प्रियकरासोबत उभ्या असलेल्या मुलीवर सामूहिक अत्याचार, एक आरोपी अटकेत

नागपूर : ८ ऑक्टोबर – नागपूर शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रियकरासोबत उभ्या असलेल्या एका मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेने नागपुरात एकच खळबळ उडाली आहे. नागपुरातील माधव नागरी भागात ही घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत एका आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, नागपुरातील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. पीडित मुलगी ही आपल्या प्रियकरासोबत रस्त्यावर उभी होती. रात्री ८ वाजण्याच्या सुमारास तेथे चार तरुण आले आणि त्यांनी पीडित मुलीसोबतच्या मुलाला मारहाण करण्यास सुरुवात केली. या तरुणाला मारहाण करुन आरोपींनी पीडित मुलीला शेजारील शिवारात नेलं आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
तक्रार दाखल होताच पोलिसांनी तातडीने आपली सूत्रे हलवली आणि आपला तपास सुरू केला. या प्रकरणातील एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. तर इतर तीन आरोपी अद्यापही फरार आहेत. फरार असलेल्या तिन्ही आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. नागपुरात यापूर्वीही अशा प्रकारच्या घटना उघडकीस आल्या आहेत.

Leave a Reply