ती माहिती नवाब मलिक यांनी तातडीने तपास यंत्रणांना द्यावी – प्रवीण दरेकर

मुंबई : ८ ऑक्टोबर – राजकीय अर्विभाव न आणता आपल्याकडील माहिती केवळ प्रसार माध्यमांसोबत उघड करुन वेळ घालविण्यापेक्षा ती महत्त्वाची माहिती राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादी कॉग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी संबंधित तपास यंत्रणाकडे द्यावी, असा सल्ला विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी दिला. आता मलिक दरेकर यांना काय प्रतिउत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
क्रुझवरील कारवाईमध्ये १० लोकांना पकडले होते. मात्र, त्यापैकी २ लोकांना सोडण्यात आले आहे. त्यापैकी भाजपच्या एका नेत्याचा मेहुणा असल्याची सविस्तर माहिती शनिवारच्या पत्रकार परिषदेत देणार असल्याचे नवाब मलिक यांनी शुक्रवारी जाहीर केले. त्यासंदर्भात बोलताना दरेकर म्हणाले, मलिक यांच्या वक्तव्यामध्ये काही तथ्य दिसत नाही. मलिक यांच्या दाव्यानुसार पकडण्यात आलेल्यांमध्ये जर कोणत्या पक्षाच्या नेत्याचा नातेवाईक असेल तर एनसीबी त्याविरुध्द नक्कीच कारवाई करेल. अटक केल्यानंतर कोणाचीही सुटका होत नाही. तरीही मलिक यांच्याकडे काही ठोस पुरावे असल्यास त्यांनी प्रसार माध्यमांसोबत जास्त वेळ घालविण्यापेक्षा संबंधित तपास यंत्रणेकडे तक्रार करावी. आणि त्यांना माहिती द्यावी. जेणेकरुन तपास योग्य पध्दतीने होईल व संबंधितांविरुध्द कारवाई होऊ शकेल, असेही दरेकर यांनी स्पष्ट केले.
मुंबईवरून गोव्याला जाणाऱ्या क्रूझवर सुरू असलेल्या रेव्ह पार्टीवर एनसीबीने शनिवारी छापा टाकला होता. शाहरुख खान याचा मुलगा आर्यन आणि त्याचा मित्र अरबाज मर्चंट याला शनिवारी रात्री एनसीबीने अटक केली होती. या प्रकरणात आतापर्यंत 18 जणांना अटक केली आहे. एनसीबीने केलेली ही कारवाई खोटी असून, क्रूझवर एनसीबीला ड्रग्स सापडलेच नाहीत. तसेच अरबाज आणि आर्यनला त्या रात्री एनसीबीच्या कार्यालयात घेऊन जाणारे दोन व्यक्ती हे एनसीबीचे अधिकारी नसून, त्यातील एक भाजपच्या उपाध्यक्ष पदावर असलेला मनीष भानुषाली तर दुसरी व्यक्ती के. पी. गोसावी नावाची होती, असा खळबळजनक आरोप मलिक यांनी केला.

Leave a Reply