गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयात नव्या पाहुण्यांचे आगमन

नागपूर : ८ ऑक्टोबर – गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयात नव्या पाहुण्यांचे आगमन झाले असून लवकरच भारतीय सफारीत हे नवे पाहुणे पर्यटकांना पाहायला मिळणार आहेत. यात अल्बिनो काळवीट (पांढऱ्या रंगाचे), काळवीट, भेकर, सांबर या वन्यप्राण्यांचा समावेश आहे. केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने दिलेल्या मंजुरीनंतर गोरेवाडा वन्यप्राणी बचाव केंद्रातील दोन वाघीण आणि दोन अस्वल नवी दिल्ली येथील राष्ट्रीय प्राणी उद्यानात स्थानांतरित करण्यात आले. त्या मोबदल्यात या उद्यानातून दहा अल्बिनो काळवीट, दहा काळवीट, २० हरीण, २० भेकर, चार सांबर गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयाला देण्यात आले. गुरुवारी पहाटे अडीच वाजता हे प्राणी घेऊन पशुवैद्यकांची चमू दाखल झाली. वन्यप्राण्यांना सद्यस्थितीत प्राणिसंग्रहालयातील तृणभक्षी वन्यप्राण्यांच्या विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. विलगीकरण कालावधी समाप्त झाल्यानंतर साधारण महिनाभराने ४० हेक्टर क्षेत्रातील तृणभक्षी वन्यप्राण्यांच्या सफारी क्षेत्रात त्यांना सोडण्यात येईल. सध्या या प्राण्यांना मानवी सहवासापासून पूर्णपणे दूर ठेवण्यात आले आहे. या नव्या प्राण्यांमुळे गोरेवाडय़ातील भारतीय सफारीचे आकर्षण आणखी वाढणार आहे.

Leave a Reply