खड्ड्यात कार पडल्याने झालेल्या अपघातात एक ठार तर तीन जखमी

वर्धा : ८ ऑक्टोबर – महामार्गावरील कारंजा घाडगे येथे ऊड्डाणपुल बांधकामाच्या खड्ड्यात महानुभावपंथीयांची भरधाव कार पडल्याने झालेल्या भिषण अपघातात एक जण ठार तर तीनजण गंभीर जख्मी झाल्याची घटना आज सकाळी साडेनऊच्या दरम्यान घडली. या अपघातात विष्णू शिवणकर(४५) नागपूर हा इसम ठार झाला.गंभीर जख्मी झालेले हंसराज डांगे(५०),अविनाश कारणकर व ज्योत्सना(अरूणा)अविनाश कारणकर या पतीपत्नींना तातडीने नागपूरला उपचारासाठी हलविण्यात आले.शेवंता महादेव जाधव (६९) या महिलेला मात्र कोणतीच इजा झाली नसल्याने त्या सुखरूप आहे.
महानुभावपंथीय असलेले कारमधील सर्व प्रवासी आज सकाळी आठ वाजता नागपूरवरून अहमदनगर जिल्ह्यातील डोमेग्राम येथे दर्शनासाठी निघाले होते. कारमध्ये दोन महिला व दोन पुरूष आणि कारचालक असे पाच जण प्रवास करीत होते. कारंजा येथील उड्डाणपूल बांधकामाच्या परीसरात एमएच ०६ ऐझेड ८३३३ क्रमांकाची कार महामार्ग सोडून वळण घेत सर्विसरोडला येताच बांधकामासाठी खोदून ठेवलेल्या खड्ड्यात पडून पलटली. घटनास्थळाच्या परिसरातील नागरिकांच्या नजरेत सदर अपघात पडताच अनेकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली.कारच्या काचाफोडून जखमींना बाहेर काढण्यात आले.येथील ग्रामीण रूग्णालयात तातडीने भरती करीत प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नागपूरला हलविण्यात आले.पुढील तपास कारंजा पोलीस करीत आहे.

Leave a Reply