कितीही त्रास दिला तरी महाराष्ट्राचा सह्याद्री आजवर कधी दिल्लीपुढं झुकला नाही आणि झुकणारही नाही – सुप्रिया सुळे

ठाणे : ८ ऑक्टोबर – ‘दिल्लीतील सत्ताधीशांनी कितीही त्रास दिला तरी महाराष्ट्राचा सह्याद्री आजवर कधी दिल्लीपुढं झुकला नाही आणि झुकणारही नाही,’ अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारला ठणकावलं आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी व त्यांच्या नातेवाईकांशी संबंधित कंपन्या व कार्यालयांवर कालपासून इन्कम टॅक्स व ईडीचे छापे सुरू आहेत. आजही झाडाझडती सुरूच आहे. मुंबईतील नरीमन पॉइंट इथं पार्थ पवारांच्या घरी आज अधिकाऱ्यांनी झाडाझडती घेतली. शरद पवारांचं गाव असलेल्या बारामती तालुक्यातील काटेवाडी इथं देखील ईडीचं पथक काल पोहोचलं. तिथं पवारांच्या निकटवर्तीयांची चौकशी करण्यात आली. या सगळ्या छापासत्रामुळं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अस्वस्थता आहे.
नवरात्रौत्सवाच्या निमित्तानं ठाण्यात देवदर्शनासाठी आलेल्या सुप्रिया सुळे यांना पत्रकारांनी आज याबाबत विचारलं. पवार कुटुंबाला टार्गेट केलं जातंय असं आपल्याला वाटतं का, असा प्रश्न सुप्रिया सुळे यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी वरील प्रतिक्रिया दिली. ‘अजितदादांचे नातेवाईक हे माझे सुद्धा नातेवाईक आहेत. दादा आणि आम्ही वेगळे नाही. आमचं कुटुंब एकच आहे आणि संघर्ष ही पवार कुटुंबाची खासियत आहे. ‘दिल्लीनं कितीही त्रास दिला तरी महाराष्ट्राचा सह्याद्री दिल्लीपुढं कधी झुकला नाही आणि यापुढंही झुकणार नाही,’ असं सुळे म्हणाल्या.
अजित पवार यांच्यावरील कारवाईवरून सध्या राष्ट्रवादी काँग्रेसनं भाजपवर टीकेची झोड उठवली आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी भाजपच्या नेत्यांचे व आजी-माजी मंत्र्यांचे घोटाळे बाहेर काढण्याचा इशारा दिला आहे. तसंच, अजित पवारांवरील कारवाईच्या विरोधात न्यायालयात जाण्याचाही इशारा दिला आहे.

Leave a Reply