हत्या करुन आंदोलकांना शांत केलं जाऊ शकत नाही – वरून गांधींचा पक्षाला घरचा आहेर

नवी दिल्ली : ७ ऑक्टोबर – लखीमपूर खेरी हिंसाचाराचा एक नवा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत भरधाव वेगाने धावणारी एसयुव्ही शेतकऱ्यांना चिरडून पुढे जात असल्याचं दिसत आहे. विरोधी पक्षातील नेत्यांनी हा व्हिडीओ शेअर करत मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. दरम्यान भाजपा खासदार वरुण गांधी यांनीदेखील व्हायरल झालेला हा व्हिडीओ शेअर करत पक्षाला घऱचा आहेर दिला आहे. वरुण गांधी यांनी यावेळी ही हत्या असल्याचं म्हटलं आहे.
ट्विटरला व्हिडीओ शेअर करताना वरुण गांधी म्हणाले आहेत की, “या व्हिडीओत सर्व काही स्पष्ट आहे. हत्या करुन आंदोलकांना शांत केलं जाऊ शकत नाही. निष्पाप शेतकऱ्यांच्या रक्तासाठी जबाबदार घेणं आवश्यक आहे. प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात क्रूरता आणि अहंकाराचा संदेश पोहोचण्यापूर्वी न्याय झाला पाहिजे”.
लखीमपूर खेरी हिंसाचारामुळे सध्या देशात मोठ्या प्रमाणात तणाव असून अनेक ठिकाणी उद्रेक पहायला मिळत आहे. विरोधकांकडून याप्रकरणी केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांच्या मुलाला अटक केल्याची मागणी केली जात असताना अजय मिश्रा मात्र आपला मुलगा त्यात सहभागी नव्हता असं सांगत आहेत. कार आपल्याच मालकीची आहे याची कबुली देताना अजय मिश्रा यांनी गाडीवर दगड, विटांचा हल्ला झाल्याने ताबा गेला आणि ही दुर्घटना झाली असा दावा केला आहे. दरम्यान या घटनेचा एक नवा व्हिडीओ समोर आली आहे. या व्हिडीओत काळ्या रंगाची एसयुव्ही वेगाने धावत असून निशस्त्र असणाऱ्या शेतकऱ्यांना चिरडून पुढे जात असल्याचं दिसत आहे.

Leave a Reply