नवाब मलिक यांचा एनसीबी आणि भाजपवर जोरदार हल्ला

मुंबई : ७ ऑक्टोबर – राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा एनसीबी आणि भाजपवर जोरादर हल्लाबोल केला आहे. भाजप आणि एनसीबीच्या संगनमताने बॉलिवूडमध्ये भीती निर्माण करून पैसे उकळण्याचे उद्योग सुरू आहेत, असा गंभीर आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.
नवाब मलिक यांनी मीडियाशी संवाद साधताना हा आरोप केला आहे. एनसीबी आणि भाजपच्या संगमताने बॉलिवूडला बदनाम करणे आणि बऱ्याच लोकांच्या मनात भीती निर्माण करून पैसे काढण्याचे उद्योग सुरू आहेत, असं सांगतानाच कुणाचे कुणाशी काय लागेबांधे आहेत, याची माहिती मी पुढील काळात देणार आहे, असं मलिक यांनी स्पष्ट केलं.
भाजपचे लोक आधी सांगतात त्यानंतर कारवाया होत आहेत. म्हणजे ठरवून कारवाया होत आहेत हे स्पष्ट होत असून यापेक्षा वेगळ्या पुराव्याची गरज नाही. भाजपचे लोक एनसीबीचे अधिकारी बनून लोकांना हाताला धरून नेत आहेत. एनसीबीचे लोक फरारी आरोपीची साथ घेत आहेत. म्हणजे या देशात कायद्याचं राज्य आहे की नाही हा मोठा प्रेश्न चिन्हं निर्माण झाला आहे, असा सवाल त्यांनी केला.
कितीही धाडी टाकल्या तरी आम्ही काही घाबरत नाही. या देशात एक वेगळी परिस्थिती निर्माण केली जात आहे. राज्यातील मराठी माणसाला उद्योग धंदे करण्याचा अधिकार नाही का हा प्रश्न निर्माण होत आहे. एका विशेष वर्गाला वर्ण व्यवस्थेने व्यापार धंदा करण्याचे अधिकार दिले आहेत, तेच हा व्यवसाय करतील असं पाहिलं जात आहे. बहुजन समाजातील लोकं धंदा करू शकत नाही. धंद्यात आले तर तुमच्या मागे ईडी लावू, सीबीआय लावू, असे प्रकार सुरू आहेत. मला वाटतं आता परिवर्तन झालं आहे. देशात प्रत्येकाला उद्योगधंदे करण्याचा अधिकार आहे. कितीही घाबरवण्याचा प्रयत्न केला तरी कोणी घाबरणार नाही, असं ते म्हणाले.
ज्यापध्दतीने अजित दादांच्या कंपन्यांवर धाडी टाकण्यात येत आहेत त्यावरून स्पष्ट होते आहे की, या राज्यात किंवा जिथे जिथे भाजप विरोधी सरकार निर्माण झाले आहे त्या सरकारला टार्गेट करून बदनाम केले जात आहे. जी परिस्थिती पश्चिम बंगालमध्ये होती तीच परिस्थिती राज्यात निर्माण करण्याचे काम केंद्रसरकारच्या माध्यमातून होत आहे, असा आरोपही त्यांनी केला. काल जाहीर झालेला जिल्हा परिषद पोटनिवडणुकीचा निकाल वेगळा लागला असला तरी 70 टक्के जागा जनतेने महाविकास आघाडीतील पक्षांना दिल्या आहेत. त्यामुळे जितकं आम्हाला केंद्रातील भाजप सरकार टार्गेट करेल बंगालसारखी परिस्थिती या राज्यात निर्माण होईल, असा इशाराही त्यांनी दिला.

Leave a Reply