अकोला : ७ ऑक्टोबर – बाळापुर जवळ राष्ट्रीय महामार्गावर शेळदफाट्यानजीक बुदुपारी एक वाजता बुलढाण्याहून अकोल्याकडे जाणारी एस.टी बस व अकोल्याकडून खामगाव कडे जाणारा कोळशाच्या ट्रकची समोरा-समोर धडक होऊन एसटी बस आणि ट्रकने पेट घेतला. या घटनेत दोन्ही वाहने जळून खाक झाली. बस मध्ये चालक व वाहकासह १३ प्रवासी होते. सुदैवाने यात कुणाचीही प्राणहाणी झाली नाही.
राष्ट्रीय महामार्गावरील शेळदफाट्यानजीक बस आणि ट्रकच्या जोरदार धडकेनंतर दोन्हीही वाहनांनी पेट घेतला. यावेळी एसटी बसमध्ये बसचालक नितीन लहाने रा. बुलढाणा, अंकुश सिरसाट रा. माणकी, संदीप पटोरकर रा धारणी , मंगेश संग्रामकर रा चिखली, जितेंद्र साळवे (वाहक) रा बुलढाणा, अ हमीद अ रज्जाक रा अकोला, नुर हसन लालूवाले रा वाशीम, रीतेश डोंगरे रा काटेपूर्णा, शीतल रितेश डोंगरे रा काटेपूर्णा, प्रकाश गुरव रा. बाळापुर , सिद्धार्थ डोंगरे, विरा डोंगरे रा. बाळापूर यांचा समावेश होता. यातील एस टी बसच्या चालकासह नऊ जण किरकोळ जखमी झाले. त्यांना उपचारासाठी अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले होते. तर अपघातात ट्रक चालक भगवान सींग रा मिर्झापुर (उत्तर प्रदेश ) व क्लीनर हे दोघेही किरकोळ जखमी झाले आहेत. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा होत्या.
अपघातानंतर राष्ट्रीय महामार्गावर पेट्रोलिंग करिता पोलिस वाहन जात होते. या वाहना समोरच हा अपघात झाला. यावेळी पोलिस वाहनात असलेल्या सहाय्यक पोलीस निरिक्षक विनोद घुईकर हे पोलीस कर्मचारी अक्षय देशमुख व चालक अंभोरे मार्गावरील नागरिकांनी तत्काळ बस मधील प्रवाशांची मदत करून त्यांना बसमधून बाहेर काढले. प्रवासी बाहेर पडल्यानंतर बसने पेट घेतला. पोलिस आणि नागरिकांनी प्रवाशांना तत्काळ मदत दिल्याने मोठी प्राणहानी टळली. या घटनेनंतर बाळापूरचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय आव्हाळ यांनी पोलिस कर्मचार्यांना मार्गदर्शन करीत योग्य मदत पोहोचविली. पोलिस व नागरिकांनी पेटलेली वाहने विझविण्यासाठी अग्निशमन दल पारस, बाळापूर व अकोल्याला संपर्क केला. अकोला व पारसच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहोचून वाहनांना लागलेली आग विझविली. मात्र, नजीक असलेल्या बाळापूरचे अग्निशमन वाहन वेळेवर पोहोचूनच शकले नाही. आपातकालीन स्थितीत सुद्धा बाळापूर नगरपरिषदेचा भोंगळ कारभार पुन्हा समोर आला.