अजित पवार कधीच काहीही दडवत नाही – जयंत पाटील

मुंबई : ७ ऑक्टोबर – साताऱ्यातील जरंडेश्वर साखर कारखान्यावर प्राप्तिकर विभागाने छापा टाकला आहे. जरंडेश्वर साखर कारखाना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात आहे. विशेष म्हणजे भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी कालच म्हणजे बुधवारी जरंडेश्वर कारखान्याला भेट दिली होती. त्यानंतर लगेचच ही कारवाई करण्यात आली आहे. याच प्रकरणावर आता राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार काहीही दडवत नाहीत, असं विधान त्यांनी केलं आहे.
आजपासून राज्यातली मंदिरं खुली होत आहेत. यानिमित्त पुण्यातल्या दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात ते दर्शनासाठी आले होते. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. कारखान्यांवर टाकलेल्या छाप्यांबद्दल ते म्हणाले, “आमच्या नेत्यांना बदनाम करण्याचं कारस्थान भाजपाने केलं आहे. भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवादीचा धसका का घेतला आहे, हे विचार करण्यासारखं आहे. पण आमचा कायद्यावर विश्वास आहे. छगन भुजबळ यांनाही असाच त्रास देण्याचा प्रयत्न झाला मात्र ते निर्दोष सुटले. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नेते निर्दोष आहेत. कोणताही गैरव्यवहार त्यांच्याकडून झालेला नाही तरी त्यांना बदनाम करणं हाच यामागचा हेतू आहे. या देशातल्या सर्व तपास यंत्रणा भाजपा चालवत आहे”
किरीट सोमय्या सातत्याने म्हणत आहेत की अजित पवारांनी जरंडेश्वर कारखान्यासंदर्भातली माहिती, कागदपत्रे उघड करावीत. मग तरीही अजित पवार उघड का करत नाहीत याविषयी पाटलांना विचारणा करण्यात आली. त्यावर जयंत पाटील म्हणाले, “अजित पवारांनी कशाचीच कागदपत्रं कधी दडवली नाहीत. मग जाहीर करण्याचा प्रश्च येत नाही. त्यामुळे अजित पवारांना दडवण्यासारखं काहीच नाही. ते कधीही दडवत नाहीत”.
साताऱ्यातील जरंडेश्वर साखर कारखान्यावर प्राप्तिकर विभागाने छापा टाकला आहे. जरंडेश्वर साखर कारखाना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात आहे. विशेष म्हणजे भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी कालच म्हणजे बुधवारी जरंडेश्वर कारखान्याला भेट दिली होती. त्यानंतर लगेचच ही कारवाई करण्यात आली आहे. सीआरपीएफच्या जवानांची मदत घेऊन ही कारवाई सुरू असून जरंडेश्वर कारखान्यात एक टीम दाखल झाली असल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार अजित पवारांशी संबंधित कारखान्यांच्या संचालकांच्या घरी इन्कम टॅक्स विभागाकडून कारवाई केली जात आहे. फक्त जरंडेश्वरच नाही तर दौंड शुगर, आंबलिक शुगर , जरंडेश्वर साखर, पुष्पदनतेश्वर शुगर, नंदुरबार या खासगी साखर कारखान्यांवर कारवाई सुरू असल्याचं कळत आहे. हे सर्व साखर कारखाने अजित पवारांच्या निकटवर्तीयांचे असल्याचं कळत आहे.

Leave a Reply