प्रियांका गांधी यांची भेट नाकारल्याने छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांनी विमानतळावरच मांडला ठिय्या

लखनौ : ५ ऑक्टोबर – प्रियंका गांधी यांची भेट घेण्यापासून पोलिसांनी रोखल्याने छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी लखनौ विमानतळाबाहेर ठिय्या मांडला. रविवारी लखीमपूर भागात शेतकऱ्यांसोबत झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर प्रियंका गांधी यांना पोलिसांनी अटक करुन सीतापूरमध्ये बंदिस्त करुन ठेवलेलं आहे.
बघेल यांनी सांगितलं की, त्यांना सीतापूरमध्ये पोलीस कोठडीत असलेल्या प्रियंका गांधी यांची भेट घ्यायची होती. लखीमपूरमधल्या हिंसाचारग्रस्त शेतकऱ्यांची भेट घ्यायला जात असताना त्यांना बेकायदेशीरपणे अटक करण्यात आल्याचा दावा प्रियंका यांनी केला होता. उत्तरप्रदेश सरकार अनिश्चित काळासाठी आपल्याला कोठडीत ठेवण्याचा प्रयत्न करत असल्याचंही त्यांनी सांगितलं.
भूपेश बघेल यांनी सांगितलं की ते सीतापूरमध्ये असलेल्या प्रियंका गांधी यांना भेटायला लखनौ इथं आले होते. मात्र त्यांना विमानतळावरुन बाहेर पडण्यास मनाई करण्यात आल्याचं ते म्हणाले. आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एक फोटो शेअर करत ते म्हणतात की, कोणत्याही आदेशाशिवाय मला विमानतळावरच रोखण्यात आलं आहे. त्यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये ते विमानतळावरच खाली मांडी घालून बसलेले दिसत आहेत. तर त्यांच्या आजूबाजूला पोलीस आणि सुरक्षारक्षक दिसत आहेत.
या फोटोसोबत त्यांनी एक व्हिडिओही शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ते पोलीस अधिकाऱ्यांना विचारत आहेत की, कलम १४४ तर लखीमपूरमध्ये लावण्यात आलं आहे. आम्ही तिकडे जात नाही आहोत. मग काय समस्या आहे?

Leave a Reply