उद्यापर्यंत प्रियांका गांधी यांची सुटका केली नाही तर पंजाब काँग्रेस उत्तरप्रदेशच्या दिशेने मोर्चा काढेल – नवज्योतसिंह सिद्धू

नवी दिल्ली : ५ ऑक्टोबर – उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी जिल्ह्य़ात शेतकरी आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचाराचं प्रकरण आता चिघळलं आहे. या प्रकरणी, मोदी सरकारविरोधात विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर, काँग्रेसच्या महसचिव प्रियंका गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांकडून झालेल्या अटकेनंतर काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू यांनी थेट उत्तर प्रदेश सरकारला इशारा दिला आहे. “जर उद्यापर्यंत (६ ऑक्टोबर) प्रियंका गांधींची पोलीस कोठडीतून सुटका केली गेली नाही तर पंजाब काँग्रेस उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खेरीच्या दिशेने मोर्चा काढेल”, असा इशारा नवज्योतसिंग सिद्धू यांनी दिला आहे.
नवज्योतसिंग सिद्धू यांनी आज (५ ऑक्टोबर) संध्याकाळी ट्विट करत उत्तर प्रदेश सरकारला हा इशारा दिला आहे. “जर उद्यापर्यंत शेतकऱ्यांच्या निर्घृण हत्येमागे असलेल्या केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला अटक झाली नाही आणि शेतकऱ्यांसाठी लढताना बेकायदेशीरपणे अटक करण्यात आलेल्या आमच्या नेत्या प्रियंका गांधी यांची सुटका करण्यात आली नाही तर पंजाब काँग्रेस लखीमपूर खेरीच्या हिंसाचार झालेल्या ठिकाणच्या दिशेने मोर्चा काढेल!”, असं ट्विट नवज्योतसिंग सिद्धू यांनी केलं आहे.
लखीमपूर घटनेनंतर शेतकऱ्यांची भेट घेण्यासाठी निघालेल्या प्रियंका गांधींना पोलिसांनी सोमवारी (४ ऑक्टोबर) ताब्यात घेऊन सीतापूरमधील विश्रामगृहात ठेवलं होतं. पण आता प्रियंका यांच्यावर गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे, काँग्रेसचे नेते आक्रमक झाले आहेत. त्याचप्रमाणे, सीतापूरमधील या विश्रामगृहातच तात्पुरतं जेल उभारण्यात आलं आहे.

Leave a Reply