शेतमजुराच्या मुलाची वन अधिकारी पदावर निवड

गडचिरोली : ४ ऑक्टोबर – राज्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यात अतिदुर्गम अशा पिरामिडा गावातील शेतमजुराचा मुलगा असलेल्या विलास चेन्नुरी या युवकाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश संपादन केले असून त्याची वन विभागाच्या उपविभागीय वन अधिकारी या पदावर निवड झाली आहे. राज्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या सिरोचा तालुक्यातून वर्ग 1 चा अधिकारीपदावर निवड झालेला विलास हा पहिलाच मुलगा ठरला आहे.
सिरोंचा तालुका राज्याच्या शेवटच्या टोकावर असलेला तालुका आहे. या तालुक्यात पिरमिडा हे रेघुठा पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणारे अतिदुर्गम तीनशे लोकसंख्येचा गाव असून तेलंगणाच्या सीमेला लागून आहे. या गावात वीज पुरवठा आणि मोबाईल सेवा या दोन्ही दुर्लभ गोष्टी आहेत. जायला धड रस्ताही नसलेल्या अशा गावात किष्टय्या चेन्नुरी या भुमीहीन शेतमजुराचा मुलगा असलेल्या विलास चेन्नुरी या युवकाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून यश संपादन केले असून वन विभागाच्या उप विभागीय वन अधिकारी या पदावर विलासची निवड झाली आहे.
सिरोंचा तालुक्यातून वर्ग 1 च्या अधिकारी पदावर निवड झालेला विलास हा पहिलाच तरुण आहे. विलासने आज हे यश संपादन केले असले तरी विलास च्या यशाचे रहस्य प्रतिकूल परिस्थितीतही आपले शिक्षण पूर्ण करून अति दुर्गम भागातल्या विद्यार्थ्यांसमोर आदर्श निर्माण करण्याचा त्याचे जे स्वप्न होतं ते आज प्रत्यक्ष कृतीतून उतरले आहे.
घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची वडील किष्टय्या हे शेतमजूर होते, आई आणि वडील हे दोघेही अशिक्षित असल्याने घरच्या वातावरणातून शैक्षणिक संस्कार मिळाले नाही. मात्र लहानपणापासूनच विलासला शिक्षणामध्ये आवड होती पिरमिडाच्या पहिली ते चौथीपर्यंत जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेणाऱ्या विलासने नरसिंहापल्लीच्या च्या भगवंतराव हायस्कूलमध्ये पाचवी ते दहावी शिक्षण घेतले. सिरोंचा येथे विज्ञान शाखेतून बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर विलासने थेट पुण्याची वाट धरली. पुण्याच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहात राहून बीएससीची परीक्षा उत्तीर्ण केली.
2012 ला गावाकडे परतल्यानंतर विलासला वेगळं काहीतरी करायचं ही जिद्द स्वस्थ बसू देत नव्हती. त्यामुळे विलासने अतिदुर्गम भागातल्या विद्यार्थ्यांसमोर आदर्श उभा करण्यासाठी स्वतः अधिकारी होण्यासाठी प्रयत्न करायचा निर्णय घेतला. 2015 मध्ये विलासने थेट परत पुणे गाठले पुण्यात 2015 ते 2019 पर्यंत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करत असताना स्वतःचे उत्पन्नाचे साधन नसल्याने विलासने खर्च भागवण्यासाठी दैनंदिन रोजंदारीवर केटरिंग मध्येही काम केले.
गावाकडे असलेल्या आई-वडिलांना मुलाला आर्थिक दृष्ट्या संपन्न नसल्याने काही मदत करता आली नाही. वडिलांकडून कुठलीही मदत नसताना विलासने स्वतःच्या जीवनाला कलाटणी देत जिद्दीने अभ्यास पूर्ण केला. सेल टॅक्स निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक एक्साईज विभाग, यासाठी तीन वेळा परीक्षा देऊन प्रयत्न करूनही विलासला यश मिळाले नाही. मात्र विलासने हार पत्करली नाही. तर 2018 मध्ये वन विभागासाठी झालेल्या राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा विलासने दिली त्यात चार गुण कमी पडल्याने विलास ला उत्तीर्ण होता आले नाही.
तरीही जिद्दीने विलासने परत एकदा ही परीक्षा दिली आणि 2020 मध्ये मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर विलासला मुलाखतीसाठी नागपूरला बोलवण्यात आले. नागपूरला मुलाखतीसाठी जायला विलासकडे पैसे नव्हते, मात्र कशीतरी व्यवस्था करू विलास नागपूरला गेला. आज विलास उत्तीर्ण झाला असून विलासची वन विभागाच्या उपविभागीय वन अधिकारी या पदावर निवड झाली आहे.
प्रतिकूल परिस्थितीत आर्थिक परिस्थिती घरची हलाखीची असताना घरचे शैक्षणिक वातावरण नसतानाही विलासने या दुर्गम भागातून हे यश संपादन करुन गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागातल्या तरुणांना सकारात्मक संदेश दिल्याचं दिसून येत आहे..विलासच्या आजच्या यशाची माहीती त्याच्या गावात मोबाईल सेवा नसल्याने कळु शकलेली नाही माञ लवकरच विलास गावाकडे जाऊन आई-वडिलांना भेठणार आहे ज्यांनी आयुष्यभर कठीण परिस्थितीत जीवन जगुन मुलांना मोठे केले त्या आई वडिलांना आता चांगले जीवन जगायला देऊ तसेच अतिदुर्गम भागातील तरुणासमोर जीवनात यशासाठी आदर्श उदाहरण उभे करायचे स्वप्न पुर्ण झाल्याची प्रतिक्रिया विलासने दिली आहे.

Leave a Reply