चेन्नईतून अपहरण करण्यात आलेल्या बालकाची नागपुरात सुटका

नागपूर : २० सप्टेंबर – नागपूर रेल्वे पोलिसांच्या सतर्कतेमुळे चेन्नईतून अपहरण करण्यात आलेल्या बालकाची नागपुरात सुटका करण्यात आली. दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. नागपूर रेल्वे पोलिसांच्या कामगिरीची स्तुती केली जात आहे.
नागपूर रेल्वे पोलिसांच्या कंट्रोल रुमला चेन्नई पोलिसांचा फोन आला. तामिळनाडू एक्स्प्रेसने दोन आरोपी चेन्नईतील एका बालकाचे अपहरण करुन जात असल्याचं सांगण्यात आलं. त्यामुळे रेल्वे पोलीस सतर्क झाले आणि त्यांनी ट्रेन नागपुरात येताच माहितीच्या आधारे त्या डब्याकडे कूच केली.
तपासणी सुरु केली असताना दोघा जणांसोबत एक बालक असल्याचं दिसून आलं. त्या दोघांची चौकशी केली असता त्यांच्या कडून समाधानकारक उत्तरं मिळत नव्हती. अखेर पोलिसांनी आपला झटका दाखवतात त्यांनी त्या बालकाला घेऊन जात असल्याचं सांगितलं.
मोनू गरीबदास केवट आणि शिब्बू गुड्डू केवट अशी या आरोपींची नावं आहेत. त्यांनी या प्रकरणाची कबुली देत सांगितलं की आम्ही कोणालाही न सांगता या मुलाला घेऊन निघालो. रेल्वे पोलिसांनी दोन्ही आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आणि मुलाला ताब्यात घेऊन शेल्टरमध्ये ठेवलं.
या संदर्भातील माहिती तामिळनाडू पोलिसांना देण्यात आली असून त्यांचं पथक नागपुरात येणार आहे. रेल्वे पोलिसांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे एका बालकाला अपहरणापासून वाचवण्यात आले.

Leave a Reply