लोकप्रिय अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

मुंबई : २ सप्टेंबर – छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय अभिनेता आणि बिग बॉस १३चा विजेता सिद्धार्थ शुक्लाचे निधन झाले आहे. वयाच्या ४०व्या वर्षी सिद्धार्थने अखेरचा श्वास घेतला आहे. त्याच्या निधनानंतर सर्वांनच धक्का बसला असून चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. अनेकजण सोशल मीडिया पोस्टद्वारे सिद्धार्थला श्रद्धांजली वाहत आहे.
सिद्धार्थचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाल्याची माहिती मुंबईतील कुपर रुग्णालयाने दिली आहे. बुधवारी रात्री झोपण्यापूर्वी सिद्धार्थने काही औषधे घेतली होती. त्यानंतर आज सकाळी त्याला कुपर रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी सिद्धार्थचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे समोर आले.
सिद्धार्थ छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय अभिनेता आहे. ‘बालिका वधू’ या मालिकेतून त्याने अनेकांची मने जिंकली होती. या मालिकेने त्याला लोकप्रियता मिळवून दिली होती. त्याने रिअॅलिटी शो बिग बॉस १३मध्ये सहभाग घेतला होता आणि त्या सिझनचा तो विजेताही ठरला होता. त्यानंतर त्याने खतरों के खिलाडी या शोच्या सातव्या सिझनमध्येही सहभाग घेतला होता.
१२ डिसेंबर १९८० साली सिद्धार्थचा जन्म मुंबईत झाला. त्याने एक मॉडेल म्हणून करिअरला सुरुवात केली होती. २००४ साली त्याने छोट्या पडद्यावर पदार्पण केले. त्यानंतर २००८मध्ये त्याने बाबुल का आंगन छूटे या मालिकेत काम केले. पण ‘बालिका वधू’ या मालिकेने त्याला खरी ओळख मिळवून दिली होती.

Leave a Reply