गडकरी, फडणवीसांच्या उपस्थितीत पटोले यांचे खंदे समर्थक भाजपात

नागपूर: १९ जुलै- काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जाणारे भंडारा नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष सूर्यकांत इलमे यांनी भारतीय जनता पार्टीचा झेंडा हाती घेतला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अन्य प्रमुख भाजपा नेत्यांच्या उपस्थितीत नागपूर येथे इलमे यांनी भाजपात प्रवेश केला.
सूर्यकांत इलमे हे बरेच वर्ष नगरसेवक होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असताना ते नगर परिषदेचे उपाध्यक्ष होते. नाना पटोले भारतीय जनता पक्षात आल्यानंतर त्यांनी भाजपात प्रवेश केला होता मात्र, भंडारा नगर परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उमेदवारी मिळण्याची अपेक्षा असताना ती न मिळाल्याने ऐनवेळी त्यांनी शिवसेनेत प्रवेश करून सेनेची उमेदवारी स्वीकारली होती. त्या ठिकाणी ते जास्त काळ टिकू शकले नाही. पटोले यांनी भाजप सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर ते पटोले यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जाऊ लागले होते. भंडारा जिल्ह्यातील पटोले यांच्या अत्यंत निकटवर्तीयांमध्ये इलमे यांचे नाव आवर्जून घेतले जाते. त्यामुळे त्यांच्या भाजपा प्रवेशामुळे नाना पटोले यांना मोठा धक्का बसणार आहे.

Leave a Reply