गोंदिया : १७ जुलै – अर्जुनी मोर तालुक्यातील गोठणगाव येथून धानाची रोवणी करण्यासाठी महिला मजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर व ट्रॉली पलटल्याने एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर पाच मजूर जखमी झाल्याची घटना घडली. ही घटना आज सकाळी ९.३० वाजता कवठा शिवारात घडली.
गोठणगाव येथील वामन चांदेवार याच्या शेतात रोवणी करण्याकरता नवेगावबांध येथील ११ पुरुष, महिला मजूर हितेश मन्साराम राऊत(३०) यांचा ट्रॅक्टर क्रं. एमएच ३५-८१०५, ट्राली क्र. एमच ३५ डी ८१४० चालक महेश वामन चांदेवार (३५) कवठा शिवारात जात होता. दरम्यान समोरुन येणार्या वाहन पाहून त्याने ट्रॅक्टर बाजुला वळविला असता त्याचे ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटले व ट्रॉलीसह ट्रॅक्टर रस्त्याखाली उलटले.
यात सत्यभामा मनीराम कुंभरे (५५) यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांची सून गायत्री अशोक कुंभरे (२८) हिचा पायाचे हाड मोडल्यामुळे गंभीर जखमी झाली आहे. तर देवांगणा वामन चांदेवार (४०), सरिता मुकेश चाफेकर (४०), विमल सितकुरा बडोले (६०), पंचफुला युवराज साखरे (६५) सर्व रा. नवेगावबांध हे किरकोळ जख्मी झाले. सर्व जखमींवर ग्रामीण रुग्णालय नवेगावबांध येथे उपचार सुरू आहेत. दरम्यान तहसीलदार विनोद मेश्राम यांनी जखमींची भेट घेतली. पुढील चौकशी नवेगावबांध पोलिस करीत आहेत.