मध्यवर्ती कारागृहात कैद्यांच्या दोन गटात पुन्हा झाली मारहाण

नागपूर : १५ जुलै – जुन्या भांडणाचा वचपा काढण्याच्या प्रयत्नात मध्यवर्ती कारागृहात दोन गटांमध्ये जुंपली. यात २ कैदी जखमी झाले आहेत. धंतोली पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला असून ६ आरोपींना याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.
आरोपी न्यायबंदी सौरभ राजू तायवाडे (२७), आरोपी न्यायबंदी मोनू मनोज समुद्रे (२६) आणि न्यायबंदी मो. अमीर जहीर पटेल (२८) हे पाचपावली पोलिस ठाण्यांतर्गत हत्येच्या प्रयत्न आणि मारहाणीच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत आहेत. न्यायबंदी शेख रिजवान शेख मुजीफ (३२) हा पाचपावली पोलिस ठाण्यांतर्गत हत्या आणि हत्येच्या प्रयत्नात मोक्का न्यायालय यांच्या आदेशाने मध्यवर्ती कारागृह शिक्षा भोगत आहे. न्यायबंदी प्रज्ज्वल विशाल शेंडे (२४) हा मानकापूर पोलिस ठाण्यात दरोड्याचा प्रयत्न करण्याच्या गुन्ह्यात प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी कोर्ट क्र. ४ यांच्या आदेशाने मध्यवर्ती कारागृह येथे शिक्षा भोगत आहे. न्यायबंदी संतोष अच्छेलाल गोंड ( २५) हा एमआयडीसी पोलिस ठाण्यात खुनाच्या गुन्ह्यात प्रथम श्रेणी दंडाधिकारी, हिंगणा यांच्या आदेशाने मध्यवर्ती कारागृह शिक्षा भोगत आहे. यातील आरोपी न्यायबंदी शेख रिजवान शेख मुजीफ, प्रज्ज्वल विशाल शेंडे, संतोष अच्छेलाल गोंड या तिघांचा न्यायबंदी मो. अमीर जहीर पटेल (२८) सोबत जुना वाद होता. या वादातून त्यांनी १३ जुलैला दुपारी ४.१0 वाजताच्या सुमारास मो. अमीर जहीर पटेल (२८) यास मिळून मारहाण केली. अमीर जहीर पटेलला मारहाण केल्याचे समजताच आरोपी सौरभ तायवाडे आणि मोनू समुद्रे यांनी संगनमत करून मध्यवर्ती कारागृहातील बॅरेक क्र. ५ च्या मागील बाजूस शेख रिजवान शेख मुजीफ यास पकडून डाव्या गालावर लोखंडी पट्टीने मारून गंभीर जखमी केले. यावेळी झालेल्या झटापटीत आरोपी मोनू समुद्रे हा स्वत:च्याच हाताने लोखंडी पट्टी लागल्याने किरकोळ जखमी झाला.

Leave a Reply