मंत्रिमंडळाचा शपथविधी आज सायंकाळी, पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी राणे, कराड, कपिल पाटील दाखल

नवी दिल्ली: ७ जुलै-केंद्रीय मंत्रिमंडळाचा आज बुधवारी संध्याकाळी विस्तार होणार असल्याने सध्या सर्वांचं लक्ष दिल्लीकडे आहे. महाराष्ट्रातून नारायण राणे, कपिल पाटील, भागवत कराड, हिना गावित, रणजीत नाईक-निंबाळकर यांना संधी मिळणार असल्याची जोरदार चर्चा आहे. दरम्यान, दिल्लीत वेगवान घडामोडी घडत असून, नारायण राणे हे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भेटण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत. नारायण राणेंसह कपिल पाटील, भागवत कराड हे देखील मोदींच्या निवासस्थानी पोहोचले आहेत. आज संध्याकाळी शपथविधी पार पडणार आहे.
दिल्लीमध्ये सकाळी ११.३० वाजल्यापासून नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी भेटीगाठी सुरु आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपाध्यक्ष जे पी नड्डादेखील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी उपस्थित आहेत. त्यामुळे त्यांचं मंत्रीपद निश्चित मानलं जात आहे. दरम्यान हिना गावित आणि रणजीत नाईक-निंबाळकर अद्याप भेटीसाठी पोहोचलेले नाहीत.
सध्या महाराष्ट्रातून नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर, पियूष गोयल हे तीन केंद्रीय मंत्री तसेच, रामदास आठवले, संजय धोत्रे व रावसाहेब दानवे हे तिघे राज्यमंत्रिपदाची जबाबदारी सांभाळत आहेत.
राणेंचा मंत्रिमंडळात समावेश झाल्यास राज्यात शिवसेनेविरोधात भाजपा अधिक आक्रमक होण्याची शक्यता मानली जाते. कपिल पाटील यांच्यामुळे आगरी समाजाला मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व मिळू शकेल. नंदुरबारच्या खासदार हिना गावित, माढाचे खासदार रणजीत नाईक-निंबाळकर व राज्यसभेचे खासदार भागवत कराड यांच्याही नावाची चर्चा आहे.

Leave a Reply