‘टी-५०’वाघाचा दोन महिन्यांच्या उपचारानंतर मृत्यू

नागपूर: ६ जुलै- चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा- अंधारी व्याघ्रप्रकल्पाच्या बफर क्षेत्रात वाहनाच्या धडकेत अपंग झालेल्या ‘टी-५०’वाघाचा नागपुरातील गोरेवाडा वन्यप्राणी बचाव केंद्रात सुमारे दोन महिन्यांच्या उपचारानंतर मृत्यू झाला. अपघातात या वाघाचे मागील दोन्ही पाय लुळे पडले होते.
गस्तीदरम्यान क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना मोहर्ली वनपरिक्षेातील कक्ष क्र .१८७ मध्ये ८ मे रोजी अशक्त वाघ आढळला होता. चालता येत नसल्याने व्याघ्रप्रकल्पातील क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडून त्याच्याकडे विशेष लक्ष ठेवण्यात आले. त्याच्यात काहीच सुधारणा दिसून आली नाही. त्यामुळे त्याला गोरेवाडा वन्यप्राणी बचाव केंद्रात स्थानांतरित करण्याकरिता प्रधान मुख्य वनसंरक्षक(वन्यजीव) यांनी परवानगी दिली. त्यानंतर १० मे रोजी त्याला गोरेवाडय़ात आणण्यात आले. त्याच्यावर गोरेवाडय़ातील वन्यजीव संशोधन व प्रशिक्षण केंद्रात पशुवैद्यकीय अधिकारी उपचार करत होते. सलग दोन महिन्याच्या उपचारानंतरही त्याच्या तब्येतीत सुधारणा नव्हती. ५ जुलैला पहाटे तीनच्या दरम्यान या वाघाचा मृत्यू झाला. वाघाचे शवविच्छेदन नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालयातील डॉ. माधुरी हेडाऊ यांनी केले. यावेळी मुख्य वन्यजीव रक्षकाचे प्रतिनिधी म्हणून राज्य वन्यजीव मंडळाचे सदस्य कुंदन हाते, राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाचे प्रतिनिधी म्हणून अनिल दशहरे तसेच वन्यजीव संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे संचालक डॉ. शिरीष उपाध्ये, डॉ. विनोद धूत, डॉ. भदाने, डॉ. शालिनी ए.एस., डॉ. मयूर पावशे, गोरेवाडा प्रकल्पाचे एच.व्ही. माडभूशी, वनपरिक्षेत्र अधिकारी, वनपाल, वनरक्षक तसेच वनकर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply