संपादकीय संवाद – स्वप्नील लोणकरच्या आत्महत्या प्रकरणाचा गांभीर्याने विचार व्हावा

तुम्ही तुमच्या मुलाला मंत्री करून स्थैर्य दिले पण माझ्या मुलाचे स्थैर्य तुम्ही बघू शकला नाहीत मुख्यमंत्री साहेब, असा संताप आत्महत्या करणाऱ्या स्वप्नील लोणकरच्या आईने व्यक्त केल्याची बातमी सर्वत्र प्रसारित झाली आहे. हा पुत्रवियोगाने व्याकुळ झालेल्या मातेचा तळतळाट म्हणूनच याकडे बघता येणार नाही, तर सत्ताधाऱ्यांनी जे काही घडले त्याचे गंभीर चिंतन करून झालेल्या चुकांचे प्रायश्चित्त घेण्याची वेळ आलेली आहे.
स्वप्नील लोणकर नावाच्या तरुणाने काल राहत्या घरी आत्महत्या केली स्वप्नील एमपीएससीची परीक्षा दोनदा पास झाला होता मात्र पुढे राज्यसरकार कोरोनाचे कारण सांगून काहीच करत नव्हते या सर्व प्रकारात स्वप्नील चे वय निघून चालले होते. परीक्षा प्रकरणात त्याच्या डोक्यावर कर्जही झाले होते, त्यामुळे नाईलाजाने त्याला आत्महत्येचा मार्ग स्वीकारावा लागला. या सर्व प्रकारात व्यथित झालेल्या त्याच्या आईने हा तळतळाट व्यक्त केला आहे.
कोरोनाचे कारण सांगून राज्य सरकारने गेल्या दोन वर्षात एमपीएससीच्या परीक्षा घेतल्याचं नाहीत आणि ज्या घेतल्या त्यात उत्तीर्ण झालेल्यांना कुठेही पोस्टिंग दिलेले नाही. एमपीएससीची परीक्षा पास झाल्यावर आता आपल्याला कुठेतरी चांगली नोकरी मिळेल या खुशीत उमेदवार असतो,मात्र सरकारी स्तरावर काहीच घडले नाही तर कधीतरी तो निराश होतो. अश्या निराशेतूनच मग आत्महत्येचे पाऊल उचलले जाते. स्वप्निलच्या बाबतीतही असाच प्रकार घडला आहे.
मुख्यमंत्री उद्धवपंत ठाकरेंनी आपल्या मुलाला राजकारणात प्रस्थापित करण्यासाठी फारसा अनुभव नसतानाही त्याला निवडून आणले आणि तातडीने कॅबिनेट दर्जाचे मंत्रिपदाची दिले. ज्या बाळासाहेब ठाकरेंनी आयुष्यभर राजकीय घराणेशाहीला विरोध केला त्यांच्याच सुपुत्राने तिसऱ्या पिढीतील घराणेशाही चालविण्यासाठी आपल्या मुलाला मंत्री करून राजकारणात प्रतिष्ठित केले. मात्र त्याच वेळी त्यांना आपल्या राज्यातील असंख्य बेरोजगार युवकांचे काय? याची चिंता करावीशी वाटली नाही. प्रत्येक मुद्द्यावर ते कायम केंद्राकडे बोट दाखवत राहिले. एमपीएससीची परीक्षा झाल्यावर मुलाखती घेण्यास निवड मंडळात तज्ज्ञ सदस्य असावे लागतात मात्र राज्य सरकारला हे तज्ज्ञ सदस्य नेमण्यासाठी गेल्या १८ महिन्यात वेळ का झाला नाही याचे उत्तरही राज्य सरकारने द्यायला हवे. या दरम्यान विधानपरिषदेतील १२ सदस्यांसाठी महाआघाडीचे नेते आकाश पातळ एक करत होते मात्र त्यांच्या हातात असलेल्या नेमणुका करणे त्यांना का साधले नाही हा प्रश्नच आहे. त्यामुळेच अश्या समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यातूनच स्वप्निलच्या आईने विचारलेला प्रश्न सर्वांनाच विचार करायला भाग पाडतो आहे.
राज्य सरकारने या मुद्द्यावर गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे अन्यथा अश्या अनेक दुखावलेल्या स्वप्निलच्या माता भडकून उठतील आणि त्या आगीत महाआघाडी सरकार जळून खाक होऊ शकेल याचा विचार महाआघाडीच्या नेत्यांनी करणे अत्यंत गरजेचे आहे.

अविनाश पाठक

Leave a Reply