मुंबई, ५ जुलै- सभागृहात गोंधळ घातल्याप्रकरणी भाजपाच्या १२ आमदारांचं एका वर्षासाठी निलंबन करण्यात आलं आहे. पराग अळवणी, राम सातपुते, संजय कुटे, आशिष शेलार, अभिमन्यू पवार, गिरीश महाजन, अतुल भातखळकर, शिरीष पिंपळे, जयकुमार रावल, योगेश सागर, नारायण कुचे, किर्तीकुमार भांगडिया यांना एक वर्षासाठी निलंबित करण्यात आलं आहे. हे निलंबन करण्यापूर्वी तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी आपली बाजू मांडली. त्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपली बाजू मांडली. देवेंद्र फडणवीस यांनी विनंती केली की, अशी कारवाई करू नका, मात्र त्यानंतरही १२ आमदारांवर कारवाई करण्यात आली आहे.
तालिका अध्यक्ष भास्कर जाधव म्हणाले, गेली ३६ वर्षे मी सभागृहात आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात कधी असं घडलेलं नाही. मी स्वत: आक्रमक आहे. रोखठोक आहे. मला खोटं बोलायला आवडत नाही. सत्ताधारी पक्षानं दिलेलं उत्तर विरोधीपक्षाला मान्य नसतं. यावेळी व्यासपीठावर काही सदस्य आले. आणि माझ्या समोरचा माईक ओढण्याचा प्रयत्न केला. राजदंड पळवण्याचा प्रयत्न केला. एकदा सभागृहाच्या बाहेर गेल्यावर मी व्यक्तिगत कुणाशीही कटुता ठेवलेली नाही. प्रत्येकाशी भेटतो आणि बोलतो. मी केवळ अधिवेशन चालविण्याकरीता तालिका अध्यक्ष आहे. मी दालनात बसलेलो असताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस रागात आले. ते इथेच चिडलेले होते. मी त्यांना बोललो, या बसा. ते रागवलेले होते. चंद्रकांत दादा आले. मी त्यांना माझ्या बाजूच्या खुर्चीत बसवलं. इतर सदस्यांनाही मी बसण्याची विनंती केली. मी त्यांना बोललो यातून मार्ग काढू. मात्र, विरोधी पक्ष शांत होण्याच्या मनस्थितीत नव्हते.
अनेक सदस्य माझ्या आई-बहिणीवरुन शिव्या देऊ लागले. घुसले तर घुसले, काही सदस्यांनी त्यांना आवरण्याचा प्रयत्न केला. जसे गावगुंड असतात. तसे लोकप्रतिनिधी अंगावर आले. मी त्यांना सांगत होतो याना आवरा. पण त्यांना आवरत नव्हते. तुम्ही ५०-६० जण आले तर मी एकटा आहे. मी मागे हटणार नाही. मी मागे हटलो नाही. ही स्थिती महाराष्ट्राला काळिमा फासणारी आहे, असंही तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी सांगितलं.