ओबीसी आरक्षणावरुन विधानसभेत प्रचंड गदारोळ

मुंबई: ५ जुलै- विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आज सोमवारी सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आलेत. ओबीसी आरक्षणावरुन विधानसभेत अभूतपूर्व गोंधळ झाला. सत्ताधारी आणि विरोधक आपापसात भिडले. अध्यक्षांच्या दालनाबाहेर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये धक्काबुक्की झाली. आमदार संजय कुटे आणि आमदार गिरीश महाजन यांनी अध्यक्षांचा राजदंड पळवण्याचा प्रयत्न केला.
ओबीसींचा इम्पेरिकल डेटा केंद्र सरकारने देण्यासाठी विधानसभेत ठराव मांडण्यात आला. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी हा ठराव मांडला. बराच प्रयत्न करूनही ओबीसींचा डेटा मिळाला नाही. त्यामुळे हा ठराव मांडत असल्याचं भुजबळ यांनी यावेळी सांगितलं. यावेळी विरोधकांचा जोरदार गदारोळ सुरु होता.या वेळी विरोधक आक्रमक झाले. मागासवर्गीय आयोग नेमून तो डेटा राज्य सरकारने मिळवावा, असं म्हणत सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी हा ठराव मंजुरीसाठी टाकला असता, विरोधकांनी जोरदार गदारोळ केला. या गदारोळातच ठराव मंजूर करण्यात आला. ठराव विधानसभेत पारित होत असताना विरोधक चांगलेच आक्रमक झाले होते. यावेळी अनेक आमदार वेलमध्ये उतरले.
दरम्यान, विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हा केवळ राजकीय ठराव असल्याची टीका केली. देवेंद्र फडणवीसांनी यावेळी सात दिवसाची नोटीस देणे बंधनकारक आहे. आधी नियम स्थगित करायला हवा होता. जी सूचना आलेली आहे ती कायद्यात बसत नाही, असं सांगत आक्षेप घेतला. यावर छगन भुजबळ यांनी तुम्ही सहा ते सात वर्षे काय केलं ? अशी विचारणा केली.

Leave a Reply