पुणे:४ जुलै- राज्य लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन देखील नोकरी न मिळाल्यामुळे पुण्याच्या फुरसुंगी परिसरात राहणाऱ्या २४ वर्षीय स्वप्नील लोणकर या तरुणाने आत्महत्या केल्याने संपूर्ण महाराष्ट्राला धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहीत पवार यांनी या मुद्दयावरून राज्य सरकारला विनंती केली आहे. करोनामुळे स्थगित केलेली एमपीएससीची परीक्षा आणि प्रलंबित निकाल व नियुक्त्यांमुळे युवा पिढी नैराश्यात असून, लवकरात लवकर परीक्षा घ्याव्यात, अशी विनंती पवार यांनी केली आहे. आपल्या ट्वीटमध्ये रोहीत पवार यांनी परीक्षा घेण्यासोबतच तातडीने नियुक्त्या देखील देण्याची विनंती केली आहे.
माझी राज्य सरकारला विनंती आहे की आवश्यक ती सर्व दक्षता घेऊन ही परीक्षा त्वरित घेण्यात यावी आणि प्रलंबित नियुक्त्याही तातडीने देण्यात याव्यात, असं ट्वीट रोहीत पवार यांनी केलं आहे.
राज्यात मोठ्या संख्येने तरुण एमपीएससी परीक्षेची तयारी करत असतात. त्यांच्यासाठी देखील हा धक्का ठरला. या तरुणाच्या आत्महत्येवर हळहळ व्यक्त होतानाच, दुसरीकडे एमपीएससीच्या कारभारावर आणि निर्णय प्रक्रियेतील ढिलाईवरही तीव्र टीका होऊ लागली आहे.