पोलीस कर्मचाऱ्याने स्वतःवरच गोळी झाडून घेत केली आत्महत्या

नागपूर:५ जुलै-नागपूर शहर पोलीस दलातील स्पेशल प्रोटेक्शन युनिटमध्ये कार्यरत असलेल्या एका कर्मचाऱ्याने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. प्रमोद मेरगुवार असे आत्महत्या करणाऱ्या कर्मचाऱ्याचे नाव आहे.झिंगाबाई टाकळी येथील निवासस्थानी सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने स्वतःवर गोळी झाडली, ज्यामुळे घटनास्थळीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच, मानकापूर पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले, तेव्हा प्रमोद हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते, त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता. या घटनेचे वृत्त कळताच वरिष्ठ पोलीस अधिकारीसुद्धा घटनास्थळी पोहचले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेयो) येथे रवाना करून तपास सुरू केला आहे.
प्रमोद यांना काही महिन्यांपूर्वी कोरोना झाला होता. उपचारानंतर त्यातून बरे झाल्यानंतर त्यांना काळी बुरशीच्या (ब्लॅक फंगस) आजाराने ग्रासले होते. उपचारानंतरसुद्धा प्रमोद यांचा एक डोळा पूर्णपणे निकामी झाला, तर, दुसरा डोळा ८० टक्के खराब झाला होता. आजारपणामुळे प्रमोद हे मागील काही दिवसापासून वैद्यकीय रजेवर होते. आजारपणाच्या त्रासाला कंटाळून त्यांनी ही आत्महत्या केली असावी, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Leave a Reply