दोन दिवसाचं विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता

मुंबई: ४ जुलै-महाराष्ट्र विधिमंडळाचं दोन दिवसांचं पावसाळी अधिवेशन ५ आणि ६ जुलै रोजी होत आहे. अवघ्या दोन दिवसाचं हे पावसाळी अधिवेशन वादळीच ठरण्याची शक्यता आहे. गेल्या अनेक दिवसांत राज्य सरकार विरुद्ध विरोधी पक्षात चांगलीच जुंपली आहे. त्यामुळं विविध मुद्द्यांवर पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आमनेसामने येणार आहेत.
राज्यात आता कोरोना दुसरी लाट हळूहळू कमी होऊ लागली आहे. मात्र तरी देखील राज्यावरील संकट, मात्र काही कमी झालेले नाही. आता तर राज्यात डेल्टा प्लसचे रुग्ण देखील आढळून आले असून, एका रुग्णांचा यामुळे मृत्यू देखील झाला. हा धोका ओळखून ठाकरे सरकारने पावसाळी अधिवेशन देखील दोन दिवसांचे घेण्याचा निर्णय घेतला आहे. याचमुळे आता राज्यातील वातवरण तापले असून, दोन दिवसाच्या अधिवेशनातून नेमकं काय साध्य होणार असा प्रश्न मात्र या निमित्ताने उपस्थित होऊ लागला आहे.
मागील वर्षभरापासून कोरोना संकटामुळे पावसाळी अधिवेशन, हिवाळी अधिवेशन आणि मार्च महिन्यात झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा कालावधी ठाकरे सरकारने कमी केला. मात्र आता पावसाळी अधिवेशन देखील पूर्ण आठवडे चालवावे अशी मागणी विरोधकांची असताना ठाकरे सरकारने पावसाळी अधिवेशन दोनच दिवसांचे, असा निर्णय घेतला आहे. मात्र, आता यावरुन विरोधक आक्रमक झाले असून, दोन दिवसाचे अधिवेशन देखील वादळी ठरणार आहे.

Leave a Reply