ओवेसींचे आव्हान योगी आदित्यनाथांनी स्वीकारले

लखनऊ:४ जुलै- योगी आदित्यनाथ हेच पुन्हा मुख्यमंत्री होतील, अशी चर्चा भाजपत होत असताना, एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी मुख्यमंत्री योगींना आव्हान दिलं आहे. योगी आदित्यनाथ यांना पुन्हा मुख्यमंत्री होऊ देणार नाही, असं ओवेसी म्हणाले असून, योगी आदित्यनाथांनी ओवेसींचं आव्हान स्वीकारलं आहे. एका कार्यक्रमात बोलताना योगींनी यावर भूमिका मांडली.
ओवेसींनी केलेल्या विधानावर बोलताना योगी आदित्यनाथ म्हणाले, उत्तर प्रदेशात भाजपचं सरकार बनणार. ओवेसी हे देशातील मोठे नेते आहेत. ते देशभर प्रचार करत असतात. त्यांना एका समुदायाचा मोठा पाठिंबा आहे, पण, उत्तर प्रदेशात ओवेसी हे भाजपाला आव्हान देऊ शकत नाही. भाजप आपले मुद्दे आणि मूल्ये घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरेल. आम्ही त्यांचं आव्हान स्वीकारतो आहे.
उत्तर प्रदेशात पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होत असून, राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे. उत्तर प्रदेशातील सत्ता स्वतःकडे ठेवण्यासाठी भाजपने स्थानिक परिस्थितीचा आदमास घेण्यास सुरूवात केली असून, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह भाजप केंद्रीय नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्या आहेत. दरम्यान, बिहारमध्ये चांगलं यश मिळाल्यानंतर एमआयएम इतर राज्यांमध्येही विस्तार करताना दिसत आहे. उत्तर प्रदेशात होणाऱ्या निवडणुकीतही एमआयएम मैदानात उतरणार आहे.

Leave a Reply