१४ वर्षाच्या मुलाने १२ वर्षाच्या मुलीला मागितली ५० लाखाची खंडणी

नागपूर : ३ जुलै – १४ वर्षांच्या मुलाने १२ वर्षांच्या मुलीला ५0 लाखांची खंडणी आणून दे नाही तर तुझा वडील आणि भावाला मारून टाकेन, अशी धमकी दिल्याची घटना पाचपावली हद्दीत सिद्धार्थनगर टेका येथे समोर आली. याप्रकरणी मिळालेल्या तक्रारीवरून पाचपावली पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
प्राप्त माहितीनुसार, पाचपावली हद्दीत सिद्धार्थनगर, चारखंबा चौक येथे राहणारे फिर्यादी मोहम्मद नईम अशरफ अब्दुल जब्बार यांचे गंगाबाई घाट येथे स्पेअर पार्टचे दुकान आहे. त्यांची आर्थिक परिस्थिती सधन आहे. १ महिन्याआधी एक १४ वर्षांचा मुलगा त्यांच्या घरी कबुतरांना दाणे टाकण्याचे काम करीत होता. त्याला घरच्या आर्थिक परिस्थितीबाबत चांगलीच माहिती होती. मोहम्मद नईम यांची १२ वर्षांची मुलगी तिच्या घरापासून दोन घरानंतर असलेल्या घरी मेहंदी क्लासला जाते. २५ जूनला नईम यांची मुलगी मेहंदी क्लासवरून परत येत असताना आधी तिच्या घरी काम करणारा १४ वर्षांचा मुलगा आणि त्याचा मित्र तोंडाला स्कार्फ बांधून मुलीजवळ आले. त्यांनी तिला रस्त्यात अडविले आणि तिचे दोरीने हात बांधले. अल्पवयीन मुलाने त्याच्याजवळचा चाकू मुलीच्या गळ्याला लावून तिला ५0 लाख रु. खंडणी मागितली. पैसे न दिल्यास तिच्या वडिलांना आणि भावाला मारून टाकण्याची धमकी दिली. या घटनेमुळे मुलगी खूपच घाबरली होती. दोन-तीन दिवसांपासून ती घाबरलेली दिसत असल्याने तिच्या घरच्यांनी तिला याबाबत विचारले असता, तिने घडलेला प्रकार त्यांनी सांगितला. याप्रकरणी नईल यांनी पाचपावली पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार नोंदविली. मिळालेल्या तक्रारीवरून पाचपावली पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Leave a Reply