वारकऱ्यांच्या अटकेवरून फडणवीसांची राज्य सरकारवर टीका

पुणे : ३ जुलै – करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून यंदा देखील निर्बंध लागू करत, पायी वारीस परवानगी नाकारलेली आहे. तर , राज्य सरकारच्या आदेशाला न जुमानता पंढरपूरच्या दिशेने पायी निघालेल्या बंडातात्या कराडकर यांना पिंपरी-चिंचवड पोलिसांनी आज(शनिवार)ताब्यात घेतल्याचं आहे. पोलिसांनी केलेल्या या कारवाईवरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.
“वारी हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अविभाज्य घटक! विठ्ठल-वारकरी यांचे नाते अवर्णनीय! श्रद्धा-परंपरांचे महत्त्व आहेच! बंडातात्या कराडकर यांना अटक करून सरकारने काय साधले? काहीच मध्यम मार्ग नव्हता? वारकऱ्यांचा असा अपमान? थेट अटकेची कारवाई ही सर्वथा चुकीची आहे! तीव्र निषेध!” अशा शब्दांमध्ये ट्विट करत, देवेंद्र फडणवीस यांनी या कारवाईवर प्रतिक्रिया दिली आहे.
पोलिसांनी बंडातात्या कराडकर यांना ताब्यात घेतल्यानंतर दिघीजवळील संकल्प गार्डन मंगल कार्यालयात स्थानबद्ध केलं आहे. त्यानंतर या ठिकाणी वारकऱ्यांसह त्यांच्य समर्थकांची गर्दी जमू लागली आहे. दरम्यान स्थानिक आमदार महेश लांडगे हे देखील त्यांच्या भेटीसाठी पोहचल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, आळंदी पालखी प्रस्थान सोहळ्यामध्ये सहभागी झालेल्या वारकऱ्यांची ‘आरटीपीसीआर’ चाचणी करण्यात आली. या चाचणीमध्ये २३ जण करोनाबाधित असल्याचे अहवाल प्राप्त झाले. संबंधितांवर म्हाळुंगेतील करोना काळजी केंद्रात उपचार सुरू असले, तरी काही प्रमाणात घबराट उडाली आहे.

Leave a Reply