भारत बायोटेकच्या लसींची नागपुरात लहान मुलांवर चाचणी

नागपूर : ३ जुलै – भारत बायोटेककडून कोरोना लसीकरणाच्या सुरू असलेल्या लहान मुलांच्या मानवी चाचणीच्या तिसरा टप्प्याला सुरुवात झाली. यात २ वर्ष ते ६ वर्ष या वयोगटात १४ मुलांना ही लस दिली जाणार आहे. शुक्रवारी १० लहान मुलांना लस देण्यात आली. उर्वरीत चार जणांना ट्रायल लसीचा पहिला डोज नंतर दिला जाणार आहे. नागपूरच्या मेडिट्रीना रुग्णालयात लसीचा पहिला डोस देण्यात आला, अशी माहिती चीफ इन्वेस्टिंगेटर डॉ. वसंत खडतर यांनी दिली.
यापूर्वी पहिल्या टप्प्यात १२ ते १८ वयोगटानंतर दुसऱ्या टप्प्यात ६ ते १२ या वयोगटात तर आता तिसऱ्या टप्प्यात २ ते ६ वयोगटातील स्वयंसेवी मुलांना ही लस देण्यात आली आहे. या तिसऱ्या टप्प्याच्या चाचणीसाठी २२ लहान मुलांचे स्क्रिनिंग करण्यात आले. यामध्ये १४ मुलांची निवड केली जाणार आहे. आता सर्व मुलांचे प्राथमिक आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये सुदृढ असणाऱ्या बालकांची अँटीबॉडी निगेटिव्ह असणाऱ्या मुलांची लसीच्या ट्रायलसाठी निवड करण्यात आली. यात प्राथमिक माहितीनुसार, तीन ते चार जणांच्या अँटीबॉडीज पॉझिटिव्ह आले असल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे २ ते ६ वर्ष वयोगटात सुद्धा कोरोनाची लागण झाली असल्याचे निष्पन्न झाले आहे.
यात पहिल्या टप्प्यात ६ जूनला जवळपास ५० मुलांना लस देण्यात आली आहे. त्यानंतर दुसरा टप्प्यात १६ जूनला २५ मुलांना लस देण्यात आली. तर तिसऱ्या टप्प्यात शुक्रवारी २ जुलैला १४ मुलांना लस देण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. पहिला डोस देण्यात आलेल्याना २८ दिवसांनी लसीचा दुसरा डोस दिला जाणार आहे. यामुळे या ट्रायलचा फायदा लवकर लहान मुलांसाठी लस उपलब्ध होण्यास होणार आहे.

Leave a Reply